महापूरात विद्युत वाहिनी जलमग्न होण्याचा धोका टळला
कोल्हापूर : पंचगंगा नदी ओलांडून 33/11 केव्ही शिरदवाड उपकेंद्रास जोडणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिनीची उंची वाढविण्यासाठी महावितरणने ‘टॉवर-गुढी’ उभारली आहे. पंचगंगेच्या काठावर 21 मीटर उंचीचे दोन टॉवर उभारल्याने महापूरात उच्चदाब विद्युत वाहिनी जलमग्न होण्याचा धोका टळला आहे. त्यामुळे शिरदवाड व परिसरातील आठ हजार ग्राहकांसाठी ही अखंडित प्रकाशाची ‘टॉवर-गुढी’ ठरली आहे.
महापूराच्या आपत्कालीन प्रसंगी जनजीवन सुरळीत रहावे, या हेतूने प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्या दृष्टीने पायाभूत सुविधांचे बळकटीकरणात अखंडित वीजसेवेकरीता शिरदवाड येथील ‘टॉवर-गुढी’ हा एक पायलट प्रकल्प आहे. जिल्हाधिकारी मा.श्री.राहूल रेखावार यांच्या कल्पकतेतून तो साकारला आहे. याकरीता आमदार मा.श्री. प्रकाश आवाडे यांनी पाठपुरावा केला. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतून पंचगंगा काठावर 21 मीटर उंचीचे दोन टॉवर व आठ उच्चदाब वाहिनीचे वीजखांब उभारण्यात आले आहे. आता टॉवरमुळे नदी पात्र ओलांडताना विद्युत वाहिनीची पात्रापासूनची उंची पुर्वीच्या तुलनेत 6 ते 7 मीटरने वाढली आहे. टॉवर उभारणीकरीता बाबासाहेब काळे, कुमार तारदाळे (इचलकरंजी) आणि चंद्रकांत काळे, रमेश काळे व श्रीकांत गतारे (शिरदवाड) यांनी मोलाचे सहकार्य केले. श्रीराम इलेक्ट्रीकल्सचे ठेकेदार शाहू पवार यांनी काम केले.
हेही वाचा –
गुन्ह्यात मदतीसाठी ४० हजाराची मागितली लाच | एकास अटक
अंकले येथे दुध भेसळीवर अन्नभेसळ विभागाचा छापा
जत पश्चिम भागात ४ तासचं वीज | महावितरण विरोधात असंतोष | दिग्विजय चव्हाण यांचा आंदोलनाचा इशारा
सन 2019 मधील महापूरावेळी महापारेषणच्या 110 के.व्ही. इचलकरंजी उपकेंद्रातून 33/11 केव्ही शिरदवाड उपकेंद्रास वीजपुरवठा करणारी उच्चदाब विद्युत वाहिनी पुराच्या पाण्यात बुडाली होती. त्यामुळे जवळपास 8 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा 4 दिवस बाधित झाला होता. या टॉवर उभारणीमुळे आता पुर्वस्थिती उद्भवण्याचा धोका टळला आहे. शिरदवाड उपकेंद्रावरील वीजग्राहकांना अखंडित वीज पुरवठ्याचा विश्वास महावितरणने दिला आहे. याकरीता अधिक्षक अभियंता मा. श्री.अंकुर कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली इचलंकरजी विभागाचे कार्यकारी अभियंता मा.श्री.प्रशांतकुमार राठी, उपविभागीय अभियंता मा.श्री.सुनील अकिवाटे, सहाय्यक अभियंता शिवराज पाटील यांनी कामकाज पाहिले. या नाविन्यपुर्ण उपाययोजनेच्या कामाबद्दल मुख्य अभियंता मा.श्री.परेश भागवत यांनी इचलकरंजी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.