जिल्हा विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवणार               

0

सांगली : सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जिल्हा विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवू. जिल्ह्यातील विकास कामांसाठी जिल्हा नियोजनसह राज्यस्तरांवरून भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

 

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनी मुख्य शासकीय समारंभात पोलिस परेड ग्राऊंड सांगली येथे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.

 

याप्रसंगी स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी  विजयसिंह पाटील,  जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार  मिरजकर आदि मान्यवर उपस्थित होते.

 

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सामान्य माणूस, शेती आणि शेतकरी यांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द आहे. त्यासाठी अनेक योजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत. सन 2022-2023  मध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून  363  कोटी  56  लाख रुपये पेक्षा अधिक निधी विकास कामांवर खर्च करण्यात आला आहे. यातून शिक्षण, आरोग्यासह अन्य विभागामार्फत अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2023-24 साठी 404 कोटींचा जिल्हा नियोजन आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या जिल्ह्यातील 77 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रूपयांच्या मर्यादेत 282 कोटी पेक्षा अधिक अनुदान वितरीत करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत सन 2022-23 मध्ये 1 लाख 92 हजारावर शेतकऱ्यांना 32 कोटी 91 लाखाची व्याज सवलत देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात विविध आपत्तींमध्ये बाधित झालेल्या 77 हजार पेक्षा अधिक लाभार्थीच्या खात्यावर 66 कोटी 12 लाख रुपयेहून अधिक मदत वर्ग करण्यात आली आहे.

 

पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी व कुंडल या ग्रामपंचायतीना  मा. राष्ट्रपती महोदया यांच्या हस्ते नुकतेच राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी  दोन्ही ग्रामपंचायतींचे व समस्त ग्रामस्थांचे अभिनंदन केले. तसेच सांगली येथे नुकत्याच पार पाडलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत प्रतिक्षा बागडी हिने प्रथम क्रमांकाची मानाची गदा पटकावून जिल्ह्याच्या क्रीडा लौकीकात भर घातली असल्याचे ते म्हणाले.

 

यंदाचे वर्ष हे एल निनो चे वर्ष असल्याने पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, जलस्त्रोत बळकट करावेत. वातावरणातील बदलामुळे उन्हाचा तडाखा वाढला असल्याने नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून महाराष्ट्राला त्यात प्रथम क्रमांक मिळाला हे जलयुक्त शिवार योजनेचे मोठे यश आहे. यावर्षी जलयुक्त शिवार योजनेचा टप्पा 2.0 राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यात सांगली जिल्ह्यातील एकूण 147 गावांची निवड  झाली आहे. या गावात पाणलोट जलपरीपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचाच जोडीला गाळयुक्त जमीन, गाळमुक्त धरण योजना देखील राबविली जाणार असल्यामुळे त्याचा  शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे.

 

जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी देण्यासाठी म्हैसाळ विस्तारीत योजनेतील वर्षानुवर्ष प्रलंबीत असलेली कामे गतीमान केली आहेत. या योजनेतील कामांसाठी 981 कोटी रूपयांची निविदा प्रसिध्द करण्यात आली असून स्वीकृतीसाठी ती शासनस्तरावर पाठविण्यात आली आहे. या योजनेमुळे जत तालुक्यातील 65 गावातील सिंचनाच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यात येणार आहे. लवकरच हा भाग सुजलाम सुफलाम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

सर्व नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी  मिळावे यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये मार्च 2023 अखेर 3 लाख 62 हजार पेक्षा अधिक कुटुंबांना घरगुती नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. डिसेंबर 2023 अखेर 96 हजार पेक्षा अधिक कुटुंबांना नळ जोडणीव्दारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी 683 गावांची अंदाजपत्रके तयार करण्यात आली असून यातील कामे प्रगतीपथावर आहेत.जिल्ह्यातील पाण्याची समस्या असणाऱ्या शोषित, अतिशोषीत अशा पाच तालुक्यांतील 95 गावांमध्ये अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. पाणी बचतीसाठी ठिबक व स्प्रिंकलर सारख्या उपाययोजना करीता शेतकऱ्यांना नेहमीपेक्षा जादाचे 25 ते 30 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे या गावांमध्ये शेतकऱ्यांना 75 ते 80 टक्के अनुदान प्राप्त होत आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत सन 2022-2023 या आर्थिक वर्षात 2 हजार पेक्षा जास्त शेतकरी लाभार्थ्यांना 5 कोटी 74 लाख रुपयापेक्षा अधिक अनुदान वितरित करण्यात आले असल्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.

 

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितरित्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची योजना राबविण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले,  या योजनेत  गत आर्थिक वर्षात 38 हजार पेक्षा अधिक रुग्णांनी उपचार घेतला आहे. त्यासाठी विविध हॉस्पीटलला मोबदला म्हणून 98 कोटी 48 लाख रुपयांपेक्षा अधिक निधी दिलेला आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांमध्ये सांगली  जिल्ह्याने उत्कृष्ट काम केल्यामुळे केंद्र शासनाकडून यावर्षी जिल्ह्याचा कास्य पदक देऊन सन्मान केला आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. स्मार्ट पीएचसी, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, माता सुरक्षित तर घर सुरक्षित व जागरूक पालक सदृढ बालक मोहीम, सुंदर माझा दवाखाना या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. त्याव्दारे सामान्य माणसाला आरोग्य विषयक मुलभुत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.

 

जिल्ह्यात माझी शाळा आदर्श शाळा – मॉडेल स्कुल या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत  172  जिल्हा परिषद शाळा मॉडेल  स्कूल  केल्या आहेत. दुसऱ्या टप्यात 141 शाळा  मॉडेल स्कूल होतील आणि  136 शाळांची तिसऱ्या टप्यासाठी निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे पाऊल ठरणार आहे असा विश्वास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी व्यक्त केला.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आत्तापर्यंत 15 हजार पेक्षा जास्त घरकुले पुर्ण झालेली असून 6 हजार 700 पेक्षा जास्त घरकुलांचे काम प्रगतीपथावर असल्याचे ते यावेळी म्हणाले.

 

कामगारांना व त्यांच्या कुटुंबाला सन्मान मिळावा, कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबाजवणी सुरू असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, गत आर्थिक वर्षात जिल्ह्यात 71 हजार पेक्षा अधिक कामगारांना शैक्षणिक योजनासाठी  141 कोटी 28 लाख रुपये,  आरोग्य विषयक योजनासाठी  2 कोटी 13 लाख रुपये,  इतर आर्थिक योजनासाठी  89 लाख रुपये,  सामाजिक योजनांच्या लाभासाठी – 4 कोटी 56 लाख रुपये असे एकुण 148 कोटी 86 लाख अनुदान देण्यात आले आहे.पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सांगली-मिरज ही नगरी नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सांगली येथे नव्याने होणाऱ्या अद्ययावत नाट्य मंदिरासाठी 25 कोटी रुपये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव येथील स्मारकासाठी 25 कोटी रुपये,  दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांच्या कोकरूड येथील स्मारकासाठी 20 कोटी रुपये  निधीची  तरतुद करण्यात आली आहे.जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. नविन, सुसज्ज व जिल्ह्याच्या वैभवामध्ये भर टाकणारी नविन पोलीस अधीक्षक कार्यालयाची इमारत लवकरच पूर्ण होत आहे. ही इमारत पर्यावरणपूरक वास्तू असणार आहे. जिल्ह्यातील आटपाडी, कडेगाव व कुंडल या पोलीस ठाण्याच्या इमारतींचे नविन  बांधकाम  सध्या  सुरू  आहे. त्याही लवकरच पूर्ण होतील.

 

वंचित घटकांच्या विकासासाठी शासन अत्यंत संवेदनशीलपणे कार्य करीत आहे. सन 2022-2023    या   आर्थिक   वर्षात   अनुसूचित   जाती  उपयोजनेचा निधी 100 टक्के खर्च  करण्यात आला आहे.  सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वाधार योजनेतून 108 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.27 वसतीगृहांमध्ये 2 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तर 15 हजारावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे.

Rate Card

 

महिलांच्या सन्मानासाठी राज्य शासन नेहमी अग्रेसर राहिले आहे. राज्य शासनाने महिलांच्या सन्मानासाठी  त्यांना एस.टी बसच्या प्रवासात तिकीट दरामध्ये 50 टक्के सवलत दिली आहे. सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत 25 लाखाहून अधिक  महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांसाठी एस. टी. प्रवास विनामूल्य केला असून मार्च 2023 अखेर या योजनेचा लाभ 21 लाखाहून अधिक  ज्येष्ठ नागरीकांनी घेतला असल्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी सांगितले.

 

अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा शासनाने निर्णय घेतला. त्यामुळे गोरगरीबांचा सण साजरा करण्याचा आनंद द्विगुणीत झाला. सांगली जिल्ह्यामध्ये सवलतीच्या दरात आनंदाचा शिधा 4 लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांना मिळाला आहे.

 

चालू वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा या पौष्टिक तृणधान्याचा आहारामध्ये वापर करा, निरोगी आरोग्यासाठी हे आपल्याला आवश्यक आहे.

 

भारत देशाला जगाची कौशल्य राजधानी बनविण्याचा संकल्प माननीय प्रधानमंत्री यांनी सन-2014 मध्ये जाहिर केला होता. त्यास अनुसरुन कौशल्य विकास उपक्रमांचा लाभ ग्रामीण भागातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील 500 ग्रामपंचायतीची निवड करुन त्याठिकाणी ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचे नियोजित आहे. त्यास अनुसरुन दि. 5 मे 2023 ते 6 जुन 2023 कालावधी राज्यामध्ये सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये मोफत व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील युवकांना मोफत व्यक्तिमत्व विकास व व्यवसाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामध्ये सन 2025-26 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. विकसीत भारताचे उद्दिष्ट साध्य करीत असताना भारतातील राज्यांना सुध्दा सन 2047 पर्यंत संपूर्णपणे  विकसित होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर, सन 2037 पर्यंत 2.5 ट्रिलियन डॉलर, सन 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलर इतकी पोहोचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी जिल्हा विकास आराखडा सन 2023-24 पासून तयार करावयाचा आहे. हा आराखडा तयार करताना जिल्ह्यातील संभाव्य संधी ओळखून त्या संधीचा वापर करून अल्प, मध्यम, दीर्घ मुदतीचे साध्य ठरवावयाचे आहे. त्यासाठी आपल्या सूचना, माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी. ज्याव्दारे जिल्ह्याचा परिपूर्ण व सर्वंकष आराखडा तयार करू शकू. आणि विकसीत भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी योगदान देवू, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी केले.

राज्य शासन नोकर भरतीलाही प्राधान्य देत असून आज 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्ह्यातील आरोग्य विभाग, भूमी अभिलेख, राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये नियुक्ती मिळालेल्या १५ उमेदवारांना  पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. याबरोबरच पोलीस दल, जिल्हा प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कामगार विभागाच्या वतीने दीपक पांडुरंग देशमुख यांना उपचारासाठी 25 हजाराचा आणि अक्षय विभुते यांना परदेशी शिक्षणासाठी 50 हजाराचा धनादेश वितरीत करण्यात आला.

 

ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी परेड निरीक्षण केले. परेड संचलनात पोलीस, होमगार्ड, अग्निशमन दल, बँड, श्वान, निर्भया, डायल 112, फौंरेन्सीक लॅब, बीडीडीएस आदि पथकांचा समावेश होता. पत्रकार दिपक चव्हाण यांचा  दिव्यांगाच्या विविध योजनांबाबत चित्ररथाचाही यामध्ये सहभाग होता.

या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण

 

सांगली : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील यांच्यासह उपजिल्हाधिकारी, तहसिलदार व  विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.