लाखो दिलांची धडकन,धक धक गर्ल माधुरी दीक्षित

0
Rate Card
हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार अभिनेत्री, लाखो दिलांची धडकन, धक धक गर्ल माधुरी दिक्षितचा आज  ५६ वा वाढदिवस. माधुरी दीक्षित म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीला पडलेले एक मधुर स्वप्न. आज जे ४० ते ६० या वयोगटात आहे त्यांच्यासाठी माधुरी म्हणजे सर्वस्व होते. माधुरीला पाहतच हे लोक लहानाचे मोठे झाले. मधुरीचा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणाऱ्यांची संख्या त्या काळात लाखोंच्या घरात होती. १५ मे १९६७ रोजी जन्मलेली माधुरी म्हणजे सुंदरता, नृत्य आणि अभिनय यांचा त्रिवेणी संगम.

 

वयाच्या १७ व्या वर्षी हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश करणाऱ्या माधुरीचा पहिलाच चित्रपट अबोध आपटला त्यामुळे तिच्या पदर्पणाची दखल कोणी घेतली नाही. त्यानंतर तिने काही बी ग्रेड चित्रपटातही भूमिका केल्या. उत्तर दक्षिण हा तिचा तसा पहिला व्यावसायिक चित्रपट मात्र यातीलही तिच्या भूमिकेची कोणी दखल घेतली नाही मात्र तेजाब चित्रपट आला आणि तिचे नशीबच बदलले. तेजाब चित्रपटातील एक दो तीन… हे गाणे जबरदस्त हिट झाले. या गाण्यातील तिच्या नृत्याने तरुणांना वेड लावले. या चित्रपटातील तिने साकारलेली मोहिनी नावाची भूमिका प्रेक्षक आजही रसिक विसरू शकले नाहीत. माधुरीने हा चित्रपट आपल्या अभिनय आणि नृत्याने यशस्वी करून दाखवला.

 

या चित्रपटानंतर निर्माते दिग्दर्शक तिच्या घरी रांगा लावू लागले. सलग आठ चित्रपट फ्लॉप झालेल्या मधुरीची तेजाबच्या यशानंतर यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणना  होऊ लागली. या चित्रपटात तिचा नायक अनिल कपूर हा होता. ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. पुढे या जोडीने परींदा, रामलखन, किशन कन्हैया, जीवन एक संघर्ष, जमाई राजा, खेल, बेटा,  जिंदगी एक जुआ, राजकुमार, पुकार असे अनेक हिट चित्रपट दिले.

 

माधुरीची जोडी केवळ अनिल कपूरशीच जमली असे नाही तर जॅकी श्रॉफ, मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर,  संजय दत्त, शाहरुख खान, अमीर खान, सलमान खान अशा सर्वच अभिनेत्यांशी जमली. तिने अभिनय केलेले जवळपास सर्वच चित्रपट यशस्वी झाले. तेजाब, दिल, साजन, परींदा, राम लखन, खलनायक, हम आप के है कौन, प्रेमग्रंथ, मृत्युदंड,  बडे मिया छोटे मिया, बेटा, कोयला, दिल तो पागल है, देवदास हे चित्रपट तिकीट बारीवर तुफान यशस्वी ठरले. तिचे अनेक चित्रपट हिट तर काही सुपरहिट झाले. तिच्या हम आपके है कौन या चित्रपटाने तर इतिहास घडवला.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

या चित्रपटातील तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ केले. या चित्रपटातील तिची भूमिका पाहून प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन हे तिच्यावर इतके फिदा  झाले की त्यांनी तिचे शेकडो पोट्रेट बनवले यावरून त्यांना लोक त्यांना माधुरी फिदा हुसेन असे म्हणू लागले. त्यांनी तिच्यावर गजगामीनी नावाचा चित्रपटही बनवला. माधुरीच्या नावाचे गाणेही आले ( माधुरी मिली मुझे रस्ते मे…) इतकेच काय तर तिच्या नावाने चित्रपट देखील आला ( मै माधुरी दीक्षित बनना चाहती हु) तिला अनेक पुरस्कार मिळाले.

 

प्रतिष्ठेचा  फिल्मफेअर पुरस्कार तिने तब्बल पाच वेळा मिळवला. दिल, बेटा, हम आप के है कौन, दिल तो पागल है, देवदास या चित्रपटातील तीच्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला. तिने राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला. भारत सरकारने तिला पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविले आहे.माधुरीने जवळपास ७० हुन अधिक चित्रपटात भुमीका केल्या. यातील तिच्या भूमिका आजही लोकप्रिय आहेत. लोकप्रेयतेच्या शिखरावर असतानाच तिने श्रीराम नेणे या अमेरिकास्थित उद्योगपतीशी लग्न केले. लग्नाआधी तिचे संजय दत्तशी अफेअर आहे ते दोघे लग्न करणार असे फिल्मी मासिकात छापून येत होते तिने मात्र या सर्व अफवा असल्याचे सिद्ध केले आणि लग्नानंतर थेट अमेरिका गाठली.

अमेरिकेत काही वर्षे राहिल्यावर ती पुन्हा मुंबईत परतली. मुंबईत परतल्यावर तिने गुलाब गॅंग आणि देढ इष्कीया या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. त्यानंतर तिने टेलिव्हिजनवर झलक दीखला जा, डान्स इंडिया डान्स यासारख्या नृत्यावर आधारित रिऍलिटी शो चे जज म्हणूनही काम केले. आज इतक्या वर्षानंतरही माधुरीची जादू कायम आहे. गेल्या दोन दशकात शेकडो अभिनेत्री हिंदी चित्रपट सृष्टीत आल्या आणि गेल्या पण तिची बरोबरी करणारे तर सोडाच पण तिच्या जवळपास पोहचेल अशी एकही अभिनेत्री हिंदी चित्रपट सृष्टीला मिळाली नाही यातूनच माधुरीचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. सौंदर्य, नृत्य आणि अभिनय यांचा त्रिवेणी संगम असलेल्या सदाबहार  अभिनेत्री माधुरी दिक्षितला वाढदिवसाच्या शुभेच्छा……!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.