खासदार संजय पाटील यांच्या तत्कालीन ‘पीए’सह 11 जणांवर गुन्हा

0
0

सांगली : कर्ज देण्याच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून सांगलीतील संजोग कॉलनीतील महिलेचे अपहरण करण्यात आले. तिला मिरजेत नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी तासगाव, सांगली आणि जयसिंगपूर येथील तब्बल अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.

शिवाय गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील यांचे तात्कालीन पीए अभिजित पाटील, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) तासगाव शहर प्रमुख विशाल शिंदे, युवा सेना तासगाव शहर प्रमुख सुशांत पैलवान यांचा प्रमुख समावेश आहे. सांगली शहरचे प्रभारी निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, सहायक निरीक्षक समीर ढोरे यांनी ही कारवाई केली.

याप्रकरणी पोलिसांनी अभिजित दिलीप पाटील (वय ३०, रा. तासगाव), श्रीकांत शिवाजी कोकळे (वय ४०, रा. उमदी, ता. जत), विशाल गोविंद शिंदे (वय ३९, रा. कासार गल्ली, तासगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर अतुल अशोक काळे (वय २९, रा. गणपती पेठ, सांगली), अमर गोरख खोत (वय ३६, रा. संजयनगर, सांगली), श्रीकांत आप्पासो गायकवाड (वय ३०, रा. तासगाव), मनोज नारायण चव्हाण (वय ३२, रा. कोल्हापूर रोड, सांगली), सुशांत नंदकुमार पैलवान (वय ३२, रा. तासगाव), सुयोगराज चंद्रकांत वेल्लार (वय ३७, रा. स्टॅंडजवळ, सांगली), आरीफमहमद बाबासाहेब आत्तार (वय ३८, रा. शाहुनगर, जयसिंगपूर), शीतल गोरख भजबळे (वय ३९, रा. संजयनगर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवराज संजय पाटील (वय ३६, रा. संजोग कॉलनी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.

आर्थिक वादातून गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास सर्व संशयित तीन कारमधून पाटील यांच्या घरी गेले. तेथे आम्ही एलसीबीचे लोक आहोत असे सांगून स्वाती संजय पाटील (वय ५८) यांना जबरस्तीने गाडीत घालून घेऊन गेले. तेथून संशयितांनी त्यांना मिरजेत नेले. तेथे नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिवराज पाटील यांनी शुक्रवारी सकाळी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शहर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत अभिजित पाटील, श्रीकांत कोकळे, विशाल शिंदे यांना अटक केली. तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार (एमएच १० डीजी ४३०२), स्कोडा (एमएच ०८ झेड ३८३८) जप्त केली आहे. यात वापरलेली आणखी एक एमजी हेक्टर कारचा पोलिस शोध घेत आहेत. सांगली शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मागर्दशर्नाखाली सहायक निरीक्षक समीर ढोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान यातील संशयित अभिजित पाटील हा भाजपचे सांगलीचे खासदार संजय पाटील यांचा तत्कालीन पीए होता. तर विशाल शिंदे हा शिवसेना ठाकरे गटाचा तासगाव शहर प्रमुख आहे. याशिवाय सुशांत पैलवान हा युवा सेना शहर प्रमुख आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here