आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राचा लोकोत्सव‌ !         

0

आषाढ महिना सुरू झाला की वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. लाखो वारकरी देहू आणि आळंदीत जमा होतात. डोईवर तुळशी वृंदावन व विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती हाती टाळ मृदंग, मुखी विठ्ठल, विठ्ठल जयहरी विठ्ठलचा गजर करीत, ज्ञानोबा – तुकारामांचा जयघोष करीत व खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका फडकवीत विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वैष्णवांचा मेळा निघतो हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राचा लोकोत्सव!

पालखी सोहळा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. १३ व्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करुन घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत एकनाथ महाराज तुकाराम महाराज यासारख्या संतांनी वारीची परंपरा पुढे चालवली. गेली कित्येक वर्षे सुरू असलेली ही महाराष्ट्राची परंपरा आता देशातच नाही तर विश्वात लोकप्रिय झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी व भाविक वारीमध्ये सहभागी होतात.

महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातूनही लोक वारीमध्ये सहभागी होतात. आतातर परदेशातूनही लोक खास वारी अनुभवण्यासाठी महाराष्ट्रात येतात. दिवसेंदिवस वारीतील वारकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. १९६५ च्या सुमारास आळंदीच्या पालखीमध्ये  पाच हजार वारकरी सहभागी झाल्याचा उल्लेख दि ब मोकाशी यांच्या पुस्तकात आढळतो. आज ती संख्या लाखोंच्या घरात पोहचली आहे. वृद्धांप्रामाणे तरुणही आता वारीत सहभागी होत आहेत. सहकुटूंब वारी करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. कुठलीही जाहिरात न करता, मार्केटिंग न करता लाखो भाविक वारीत सहभागी होतात. वारी म्हणजे नियोजनाचे सर्वोत्तम उदाहरण!  मार्च महिन्यातच दिंडीचे नियोजन होते.

दिंडीतील सहभागी वारकरी, आचारी, शिधा, मुक्कामाची सोय याचे सर्व नियोजन मार्च महिन्यातच होते. मार्च महिन्यात सुरू झालेले हे दिंडीचे नियोजन दिंडी पुन्हा गावी परत येण्यापर्यंतचे असते. वारीतील शिस्त तर काय वर्णवावी! कोठेही गडबड गोंधळ नसतो. स्वयंशिस्तीने चालणाऱ्या वारकऱ्यांना आस असते ती केवळ विठुरायाच्या भेटीची ! लाखो वारकरी एकत्रित असूनही त्यांच्यातील शिस्त कधी बिघडत नाही. त्यांची शिस्त समाजाला दिशा देणारीच असते. पालखी मार्गावर पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक उभे असतात.

साधू संत येती घरा….

Rate Card

तोचि दिवाळी दसरा….. !

ही भावना त्यामागे असते. अनेक सेवाभावी संस्था दिंडीतील वारकाऱ्यांसाठी फराळ व आहाराचे वाटप करतात. शासन स्तरावरुन देखील पालख्यांचे योग्य नियोजन केले जाते. पिण्याच्या पाण्याची व मुक्कामाची योग्य सोय केली जाते. वारी दरम्यान गृह विभागाकडून चोख सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. आरोग्य विभाग वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तत्पर असते. तज्ज्ञ डॉक्टरांचे  पथक कायम वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असते.  आतातर नेटकरी नेटवरही वारीचे अपडेट देत असतात. फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडियावर देखील आता वारीचा अमूभव घेता येतो. त्यामुळे वारीदेखील आता ग्लोबल झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.