सातही खंडातील सात शिखरे सर करणार ; संभाजी गुरव | सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने सत्कार

0सांगली : एव्हरेस्ट सर केल्यानंतर आता जगातील सातही खंडातील सात मोठी शिखरे मला पादाक्रांत करायची आहेत. त्याची तयारी मी सुरु केली आहे, अशी माहिती एव्हरेस्टवीर पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांनी दिली.

सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने सांगलीतील यशवंतनगर येथे गुरव यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज काटकर व जिल्हा कोषाध्यक्ष महादेव केदार यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

गुरव म्हणाले की, शिखर सर करण्याची तयारी करताना पोलीस दलातील माझे वरिष्ठ अधिकारी, अनेक लोकांनी मला सहकार्य केले. त्यामुळे अनेकांचे योगदान यात आहे. माध्यमांनीही ही कामगिरी लोकांपर्यंत पोहचवून शिखराएवढे कौतुक मला मिळवून दिले. अशाप्रकारे यश मिळविणाऱ्या लोकांना योग्य सन्मान देण्याचे काम पत्रकारांनी केले आहे. त्यामुळे त्यांचीही साथ मोलाची आहे. एव्हरेस्ट सर करुन मी थांबणार नाही. आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक या सातही खंडातील सात महत्त्वाची शिखरे मला सर करायची आहेत. त्याची तयारी मी सुरु केली आहे.


Rate Card
सांगली जिल्ह्यातील मी असल्याने येथील लोकांनीही खुप कौतुक केले. जिल्ह्याचे, पोलीस दलाचे, महाराष्ट्राचे तसेच देशाचे नाव माझ्या कामगिरीतून उंचावण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

काटकर म्हणाले की, संभाजी गुरव यांच्या माध्यमातून प्रथमच मराठी पोलीस अधिकाऱ्याने ही कामगिरी केल्याने आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. विधायक पत्रकारितेची सांगली जिल्ह्याची परंपरा असून त्याचाच भाग म्हणून समाजातील अशा यशस्वी लोकांचा सन्मान करण्याचे काम पत्रकार संघटनेमार्फत करीत आहोत.

यावेळी चंद्रकांत गायकवाड, आप्पा पाटणकर, प्रवीण शिंदे, तानाजी जाधव, किरण जाधव, असिफ मुरसल, कुलदीप माने, सरफराज सनदी, विजय पाटील, हर्षदा माळी, सचिन ठाणेकर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.