जत : जत तालुक्यातील उमदी येथील एका आश्रमशाळेतील तब्बल १५४ विद्यार्थ्यांना रविवारी जेवणातून विषबाधा झाली आहे.विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना जत ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ,ग्रामीण रुग्णालय माडग्याळ, मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचारांसाठी दाखल केले आहे.सर्वाचे प्रकृत्ती स्थिर असल्याचे समजते आहे.
एकूण १५४ विद्यार्थ्यापैंकी मिरज शासकीय रुग्णालय २६, जत ग्रामीण रुग्णालय ५७, कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालय ४१, माडग्याळ ग्रामीण रुग्णालय २० आणि आश्रम शाळेत १० विद्यार्थीं असे १५४ विद्यार्थ्यांवर उपचार चालू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली आहे.त्यांची प्रकृती चांगली आहे.काही प्रमाणात बिघडलेल्या उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहेत.
माडग्याळ, जत व मिरज तिन्ही ठिकाणी डॉक्टरांना तात्काळ व सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घटनेची माहिती व दखल घेतली असून, विद्यार्थ्यांच्या उपचारांत कोणतीही उणीव ठेवू नये, अशा सूचना त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची यंत्रणा व जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या आहेत. तसेच, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांना सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याच्या व दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.दरम्यान अचानक झालेल्या या विषबाधेच्या घटनेने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असून विद्यार्थ्यांच्या प्रकृत्तीवर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.