जादा दराने निविष्ठा, खतांची विक्री होत असल्यास तक्रार करा ; जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी
सांगली : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात 15 एप्रिल 2021 पासून सहा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्ह्यात कुठेही जादा दराने निविष्ठा विक्री किंवा खतांची विक्री होत असेल तर शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी तसेच जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून तक्रारीची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 3 लाख 84 हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. भात 17 हजार 400 हेक्टर पैकी 11309 हेक्टर, ज्वारी 50 हजार 600 हेक्टर पैकी 428 हेक्टर, बाजरी 56 हजार हेक्टर पैकी 2106 हेक्टर, मका 37 हजार 100 हेक्टर पैकी 2 हजार 276 हेक्टर, कडधान्य 29 हजार 600 हेक्टर पैकी 1 हजार 401 हेक्टर, सोयाबीन 59 हजार हेक्टर पैकी 5 हजार 257 हेक्टर व भुईमूग 32 हजार 200 हेक्टर पैकी 3 हजार 632 हेक्टर, अशी एकूण 26412.50 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून सरासरीच्या दहा टक्के पेरणी झाली आहे.
खरीप हंगाम 2021-22 करिता 1 लाख 42 हजार 160 मेट्रिक टन खताच्या मागणी पैकी आज अखेर 66 हजार 332 मेट्रिक टन खत प्राप्त झाले आहे. युरिया 20 हजार 218 मेट्रिक टन, डीएपी 4 हजार 743 मेट्रिक टन, एम ओ पी 7 हजार 252 मेट्रिक टन, एसएससी 9 हजार 791 मेट्रिक टन व एनपीके 24 हजार 328 मेट्रिक टन खताचा पुरवठा एप्रिल व मे मध्ये झालेला आहे.
सांगली जिल्ह्याकरिता खरीपात 4 हजार 565 मेट्रिक टन बफर स्टॉक करण्यात आले असून जिल्ह्यामध्ये खरीपासाठी 33 हजार 110 क्विंटल मागणी करण्यात आली होती. आज अखेर 30 हजार 336 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून 16 हजार 952 क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे.
सांगली जिल्ह्याकरिता राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेंतर्गत सोयाबीन 736 पिक प्रात्यक्षिकासाठी 236 क्विंटल, भुईमूग 10 प्रात्यक्षिके व 350 मिनी कीट, मका 270 प्रात्यक्षिकासाठी 42 .20 क्विंटल, बाजरी 1290 प्रात्यक्षिकाकरिता 52.44 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा तालुक्यांना करण्यात आला आहे.
अनुदानावर प्रमाणित बियाणे मका 172 क्विंटल, तुर 24 क्विंटल, बाजरी 185 क्विंटल उपलब्ध करून देण्यात आली असून महाडीबीटी वर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे. सोयाबीन प्रमाणित बियाणे उपलब्ध करण्याबाबत मागणी केलेली आहे. शेतकऱ्यांनी पुरेशी ओल झाल्यानंतरच बियाणे उगवण क्षमता चाचणी घेतल्याप्रमाणे बियाणे दर बदल करून पेरणी करावी, असे आवाहनही श्री. मास्तोळी यांनी केले आहे.
जिल्ह्यात शिराळा तालुक्यात तुरळक पाऊस

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.4 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात 1.6 मि.मी. तुरळक पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.7 (67.8), जत 0.0 (101.5), खानापूर-विटा 0.1 (14.1), वाळवा-इस्लामपूर 0.5 (40.3), तासगाव 0.1 (56.4), शिराळा 1.6 (65), आटपाडी 0.1 (48.9), कवठेमहांकाळ 0.1 (47.7), पलूस 0.2 (53.2), कडेगाव 0.0 (46.6).
जिल्ह्यातील वारणा धरणात 13.61 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 13.61 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 29.19 (105.25), धोम 4.96 (13.50), कन्हेर 2.20 (10.10), दूधगंगा 7.69 (25.40), राधानगरी 2.24 (8.36), तुळशी 1.77 (3.47), कासारी 0.74 (2.77), पाटगांव 1.37 (3.72), धोम बलकवडी 0.67 (4.08), उरमोडी 5.80 (9.97), तारळी 2.93 (5.85), अलमट्टी 23.32 (123).
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कण्हेर 24, वारणा 600, दुधगंगा 100, राधानगरी 1400, तुळशी 200, पाटगाव 200, उरमोडी 200 व अलमट्टी धरणातून 8 हजार 967 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 17.7 (45), आयर्विन पूल सांगली 9.4 (40) व अंकली पूल हरिपूर 4.7 (45.11).
