तासगाव : तासगाव तालुक्यातील निमणी हद्दीत पाचवा मैल येथील शिवनेरी ढाब्यावर झालेल्या हाणामारीत एका वेटरचा मृत्यू झाला. मारामारीची घटना बुधवारी रात्री झाली. याबाबत तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सचिन बाळासो कदम (वय ३५, मुळगाव मिरजवाडी, सध्या रा. जयसिंगपूर) असे मृत वेटरचे नाव आहे. कदम शिवनेरी ढाब्यावर वेटर म्हणून काम करत होता. तर ढाबा चालवणारे बबलू घोडके-पाटील यांच्यासह अन्य तिघांची कदमसोबत किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती. त्यातूनच झालेल्या हाणामारीत कदमचा मृत्यू झाला.
सचिन कदम हा वीस दिवसापासून शिवनेरी ढाब्यावर वेटर म्हणून काम करत होता. मात्र त्याच्यात आणि ढाबा चालवायला घेतलेल्या बबलू उर्फ रोहन घोडके-पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी होत होती. बुधवारी रात्री देखील त्यांच्यात वादावादी झाली.
त्यानंतर बबलू उर्फ रोहन, स्वप्निल लक्ष्मण शेंडगे आणि एक अल्पवयीन तरुण या तिघांनी सचिन कदमला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयातून तासगाव पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात पंचनामा केला. चौकशीसाठी संशयतांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.