करणी काढणाऱ्या कारंदवाडीच्या प्रकाश मामाचा भांडाफोड

0
सांगली : मेलेल्या सवतीने केलेली करणी काढण्यासाठी अघोरी उपाय करणाऱ्या कारंदवाडीच्या प्रकाश विष्णू शेंबडे पाटील उर्फ मामा यांचा भांडाफोड अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली आणि आष्टा पोलीस यांनी स्टिंग ऑपरेशन करून आज केला. प्रकाश पाटील उर्फ मामावर आष्टा पोलिसांनी ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013’ च्या कलम ३(२) अन्वये  गुन्हा दाखल केला आहे.
त्याबाबत सविस्तर हकीकत अशी की, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगलीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्याकडे सुमारे एक महिण्यापुर्वी कारंदवाडी येथे प्रकाश विष्णु शेंबडे पाटील ऊर्फ मामा हा त्याचे रहाते घरी दर गुरुवार, रविवार व अमावस्येच्या दिवशी दरबार भरवुन लोकांचे समस्यावर दैवी, अघोरी व जादुटोणा करुन उपाय सुचवून अंधश्रध्दा पसरवितो अशी एक निनावी तक्रार आली होती. त्या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला कार्यकर्त्या आशा धनाले, त्रिशला शहा आणि डॉ. सविता अक्कोळे यांना डमी भक्त म्हणून दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 चे सुमारास कारंदवाडी येथे प्रकाश पाटील मामा याचे दरबारात पाठवले. तेव्हा त्यांचे घरी दरबार सुरु होता. दरबारामध्ये प्रकाश पाटील मामा यांनी काय त्रास आहे म्हणुन विचारले तेव्हा त्यास अंनिस कार्यकर्त्या आशा धनाले यांनी सांगितले की, “माझी मयत सवत माझ्या स्वप्नामध्ये येते व मला त्रास देते व माझ्या अंगातुन प्रचंड वेदना होतात” असे खोटे सांगीतलेवर प्रकाश विष्णु शेंबडे पाटील ऊर्फ मामा यांनी भंडाऱ्याचे रिंगण काढुन, धनाले यांच्या कपाळावर भंडारा लावुन सुमारे तासभर रिंगणामध्ये बसविले. त्यादरम्यान भंडारा घातलेले एक ग्लास पाणी पिण्यास दिले व तुम्हाला पाच रविवार माझेकडे दरबारात यावे लागेल मग तुम्हाला बरे वाटेल असे सांगीतले.
त्यानंतर प्रकाश विष्णु शेंबडे पाटील ऊर्फ मामा हा अंधश्रध्दा पसरवित असल्याबाबत अंधश्रध्दा निर्मूलन समितीची खात्री झाल्याने आष्टा पोलीस ठाणेस माहीती देवुन तक्रार देण्याचे ठरले.
त्याप्रमाणे आज दि.3 जानेवारी रोजी सकाळी 10 चे चे सुमारास आष्टा पोलीस ठाणे येथे अंनिसचे कार्यकर्ते गेले. प्रकाश विष्णु शेंबडे पाटील ऊर्फ मामा रा. कारंदवाडी हा भंडा-याचे रिंगणात बसवुन भंडा-याचे पाणी पिण्यास देवुन, मंतरलेला ताईत देवुन अंधश्रध्दा पसरवितो अशी पोलीसांना माहीती दिली. त्यावेळी पोलिसांनी  अंनिसच्या महिला कार्यकर्त्यासोबत साध्या वेशात पोलीस दिला. साध्या वेशातील पोलिसांना घेऊन अंनिस कार्यकर्ते प्रकाश मामा याचे कारंदवाडीच्या दरबारात पोहोचले. कार्यकर्त्यांचा नंबर आल्यानंतर प्रकाश पाटील मामा यांना अंनिस कार्यकर्ते आशा धनाले यांनी ‘माझ्या मयत सवतीचा त्रास वाढलेला आहे’ असे सांगीतले. त्यावर उपाय म्हणून त्यांनी परत भंडा-याचे रिंगणात बसवुन कपाळावर भंडारा लावुन, जिभेवर भंडारा टाकुन आता तुम्हाला बरे वाटेल असे सांगीतले. त्यानंतर त्यांनी मंतरलेला ताईत दिला व डॉक्टरांची औषध घेवू नका म्हणून सांगीतले. इच्छेप्रमाणे दक्षिणा ठेवण्यास सांगीतले. याच दरम्यान आष्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधौंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनमित राऊत, सहाय्यक पोलीस फौजदार दीपक भोसले, पोलीस नाईक दीपक पाटील, महिला पोलीस उज्वला पाटील, पोलीस हवालदार प्रवीण ढेपने आणि अंनिस कार्यकर्ते राहुल थोरात, शशिकांत बामणे हे मामाच्या दरबारात दाखल झाले. त्यावेळी प्रकाश मामा लोकांच्यावर अघोरी दैवी उपाय करत होता. दैवी अघोरी उपायासाठी वापरणारे ताईत गंडेदोरे भंडारा लिंबू अशा वस्तू पोलीसांनी सदर ठिकाणचा सविस्तर पंचनामा करुन संबंधीत वस्तू जप्त केल्या आहेत. पोलीस प्रकाश मामाला ताब्यात घेऊन आष्टा पोलीस स्टेशनला घेऊन आले.
प्रकाश विष्णु शेबडे पाटील ऊर्फ मामा हा त्याचे देव्हा-यात ओटी असून ती  आपोआप आलेली आहे असे म्हणून चमत्काराची अंधश्रध्दा ही पसरवित होता.
प्रकाश मामा हा आपल्या जवळ असलेल्या दैवी उपचाराने भक्तांच्या सर्व समस्या दूर होतात असा दावा करुन, भक्तांना भंडा-याचे पाणी पिण्यास देवुन तसेच जिभेवर भंडारा टाकुन, गळ्यात ताईत बांधण्यास देवुन अनिष्ट व अघोरी उपचार करुन लोकांची दिशाभुल करीत असल्याची खात्री झाली तेव्हा  तरी प्रकाश विष्णु शेंबडे पाटील ऊर्फ मामा रा. कारंदवाडी यांचेवर आष्टा पोलिसांनी अंनिस कार्यकर्त्या आशा धनाले यांच्या फिर्यादीवरून जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत गुन्हा नोंद केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधौंड करीत आहेत.
चौकट:
दरबारात बसून आपल्या दैवी शक्तीने कोणी करणी केली आहे हे सांगणारा प्रकाश मामा, आपल्या दरबारात अंनिस कार्यकर्ते आणि पोलीस हे डमी भक्त म्हणून आले आहेत हे सत्य तो दैवी शक्तीने ओळखू शकला नाही. त्यामुळे तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
अशाप्रकारे लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन फसवणूक करणाऱ्या बुवा बाबांपासून जनतेनी सावध राहावे आणि त्यांच्याविषयी काही तक्रार असल्यास पोलीस स्टेशन किंवा अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा असे आवाहन अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांनी केले आहे.
– महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा सांगली.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.