उमराणी : परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने तालुक्याच्या दक्षिण भागातील उमराणी परिसरात दुष्काळाची दाहकता वाढत असून,तलाव,ओढापात्रावरील सर्वच बंधारे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचा सामना कसा करावयाचा, या प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने या भागातील नाले, ओढे वाहिले नाहीत.त्यामुळे पाण्याची पातळी वाढली नाही. झालेल्या पावसाने उभ्या असलेल्या पिकांना केवळ दिलासा दिला.

त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न काही अंशी सुटला होता.मात्र रब्बीच्या पिकांना पाणी नसल्याने पिके सुकू लागली आहेत.तर परिसरातील पाणी स्ञोत संपत चालल्याने ते कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे.दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने या भागातील लोकांना सातत्याने दुष्काळाचा सामना करवा लागतो. या सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडणे हा उपाय ठरणार असून विस्तारित म्हैसाळ योजना गतीने करून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.
आता पाऊसकाळ नसल्याने पाण्याची परिस्थिती आताच भयानक झाली आहे.
दोन महिन्यांनंतर पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शासनाने आतापासूनच टँकर व चारा छावण्या सुरू करण्याबाबत नियोजन केले तरच शेतकरी तारणार आहे.दुष्काळग्रस्त गावातील नागरिकांना त्या गावामध्येच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गतची कामे प्रभावीपणे राबविणे अत्यावश्यक आहे.