जत : कोचिंग क्लासेस नियमनासाठी नुकतीच केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक नियमावली मधील जाचक अटी व शर्ती रद्द कराव्यात या मागणीचे निवेदन राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.याप्रसंगी राज्याचे विशेष सल्लागार संजय कुलकर्णी, राज्य समन्वयक प्रतापगस्ते, राज्य कार्याध्यक्ष सुधाकर सावंत, जिल्हा समन्वयक सूर्यकांत तवटे व जिल्हा सल्लागार गणेश जोशी उपस्थित होते.
यावेळी शिक्षण मंत्री केसरकर यांना अन्यायकारक अटींविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस बंदी यासारख्या जाचक अटींमुळे सर्वसामान्य क्लास चालक रस्त्यावर येईल आणि त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल. केंद्र सरकारने केलेले नियम हे मोठ्या कार्पोरेट क्लासेसना डोळ्यासमोर ठेवून केलेले आहेत आणि त्यात सर्वसामान्य क्लास चालक ही भरडला जात आहे.
याबाबत शिक्षण मंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरच याबद्दल बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.शिक्षण मंत्र्यांनी यावरती लवकरात लवकर निर्णय घेऊन सर्वसामान्य क्लास चालकांना दिलासा द्यावा,अशी मागणी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम महाराष्ट्र राज्य यांचे वतीने करण्यात आली.