जत : श्री.क्षेत्र मुचंडी येथील श्री.दरिदेवाच्या यात्रेस सुरूवात, शनिवार दिनांक २७ एप्रिल रोजी महानैवैद्य तर रविवारी पहाटे सबिना मिरवणूक व पालखी उत्सव संपन्न होणार आहे.महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सिमेवर असलेले मुचंडी येथिल श्री.दरिदेव देवाचे मंदिर हे फार प्राचिन असून हे जागृत देवस्थान आहे.श्री.दरिदेवाची यात्रा ही दरवर्षी चैत्र पोर्णीमेपासून सुरू होते.श्री.दरिदेवाची पालखी व सबिना ही मूळ नक्षत्रात निघते.श्री.दरिदेवाच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे श्री.दरिदेवाचे मंदिर हे कर्नाटक राज्यातील तिकोटा तालुक्यातील कनमडी ग्रामपंचायत हद्दीत येते तर श्री.दरिदेवाची बहिण देवी जक्कमा हिचे मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी ग्रामपंचायत हद्दीत ओढापात्रातील डोहावर आहे.
या यात्रेविषयी व श्री.जक्कमादेवी विषयी अशी अख्यायीका आहे की,श्री.जक्कमादेवीने आपला बंधू श्री.
दऱ्याप्पा हा मल्लेश राज्याबरोबर झालेल्या युद्धात बेपत्ता झाला म्हणून देवी जक्कमाने आपल्या भावाचा दरिदेवाचा वियोग सहन न होऊन येथील ओढापात्रातील डोहात जलसमाधी घेतली होती.त्यानंतर भगवान श्री.शंकर व माता पार्वतीदेवीने श्री.दरिदेवाची व श्री.दरिदेवाची बहिण श्री.जक्कमादेवीची भेट घडविल्याने या यात्रेत प्रथम दर्शनाचा व महानैवैद्याचा मान देवी श्री.जक्कमादेवी यांना असल्याने भाविकभक्त श्री.जक्कमादेवीचे प्रथम दर्शन घेऊन देवीला महानैवैद्य देवून नंतर श्री.दरिदेवाच्या दर्शनाला व देवाला महानैवैद्य देण्यासाठी जातात अशी अख्यायीका आहे.श्री.दरिदेवाला घुळी सोडण्याची प्रथा आहे.घुळी प्रथा म्हणजे प्रत्येक कुटुंबातील एक कर्ता पुरूष या पुरूषाने दरवर्षी श्री.दरिदेवाच्या यात्रेत येऊन त्याठिकाणी स्नान करून नविन कपडे घालून आपल्या अंगावर अंबाडा या वनस्पतींपासून वाकाने बनविण्यात आलेल्या चाबकाने फटकारे मारून घेत व फटकारे घेत घेत श्री.दरिदेवाच्या नावाने चांगभल व श्री.जक्कमादेवीच्या नावाने चांगभल असा देवाचा गजर करतात.
भक्ताच्या नवसाला पावणारा मुंचडीचा दरिदेव
या यात्रेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सिमेवर भरत असल्याने व या यात्रेचे संपूर्ण नियोजन हे कर्नाटक राज्यातील कनमडी ग्रामपंचायत यांच्यामार्फत होत असल्याने यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्नाटक पोलीसांचा बंदोबस्त असतो.तसेच या यात्रेत कर्नाटक राज्यातून आलेले भाविक भक्त यांच्यासाठी कर्नाटक हद्दीत एस.टी.डेपो ची व्यवस्था करण्यात येते तर महाराष्ट्रातून येणारे भाविकभक्त यांच्यासाठी महाराष्ट्र हद्दीत एस.टी.डेपोची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येते.श्री.दरिदेव हे जागृत व नवसाला पावणारा देव अशी ख्याती असल्याने या यात्रेत देवाला बोललेला नवस पूर्ण झाला म्हणून भाविक भक्त देवाच्या शेकडो पायऱ्यांवर नारळ फोडून आपला नवस फेडतात.ही यात्रा चांगल्या प्रकारे पार पडावी यासाठी यात्रा कमिटीने भाविकांसाठी सर्व त्या प्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.यात्रा चांगल्या प्रकारे पार पडावी यासाठी श्री.दरिदेव देवस्थान कमिटी कनमडी चे कार्याध्यक्ष श्री.एम.आर.तुंगळ,उपाध्यक्ष श्री.बी.आय.पाटील,कार्यदर्शी श्री.शिवानंद पुजारी सदस्य श्री.मल्लाप्पा तुंगळ,भिमराया कोंडी,बसगोंडा पाटील,सदाशिव कोळी,शिवानंद बिरादार,बसवराज पुजारी,महांतेश कोरे,हणमंत पुजारी,बाबूगोंडा बिरादार ,विठ्ठल करवडे ,आण्णाप्पा पुजारी आदी पदाधिकारी यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.