गेल्या काही वर्षांत जंक फूड किंवा फास्ट फूड यांविषयीची आवड लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. यामध्ये तरुण वर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. शाळकरी मुलांमध्येही हल्ली जंक फूडची विशेष क्रेज दिसून येते. लोकांची वाढती आवड लक्षात घेऊन शहरासारख्या ठिकाणी प्रमुख मार्गांसह, बाजारपेठा, रेल्वे -बस स्थानके, शाळा महाविद्यालये यांसारख्या ठिकाणी जंक फूडचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात उभारले जाऊ लागले आहेत. या जंकफूडपैकीच एक असलेला ‘शोर्मा’ नावाचा मांसाहारी पदार्थ आजमितीला अनेकांच्या आवडीची डिश बनला आहे. अनेकजण तो घरी बनवण्याचाही प्रयत्न करताना दिसतात; मात्र रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या या पदार्थाची चव घरी बनवल्या जाणाऱ्या शोर्माला येत नाही असे मत खाद्य पदार्थाचे शौकीन व्यक्त करतात. तरुणांच्या जिभेचे चोचले पुरवणारा हाच शोर्मा आज अनेकांचे आरोग्य बिघडवणारा आणि काहींचे तर प्राण घेणारा ठरू लागला आहे. त्यामुळे कोणी जर हा रस्त्यालगतचा शोर्मा खात असेल तर त्यांनी सावध व्हायला हवे. मांसापासून बनवलेले पदार्थ उघड्यावर विकणे बेकायदेशीर असतानाही आज या नियमांची ठिकठिकाणी सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे.
२०२२ मध्ये केरळच्या कासारगोड येथे शोर्मा खाल्यामुळे ५८ जणांना विषबाधा झाली होती. त्यापैकी एका लहान मुलीचा दुर्दैवी अंत झाला होता. या शोर्माचे नमुने तपासले असता त्यामध्ये बुरशी तयार झाल्याचे लक्षात आले. या बुरशीमुळेच खाणाऱ्यांना विषबाधा झाली होती. ही घटना घडल्यानंतर तामिळनाडूचे आरोग्यमंत्री मा सुब्रमनियन यांनी लोकांना शोर्मा न खाण्याचे आवाहन केले होते; मात्र लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले, आज देशभरात हा शोर्मा शहरांसोबत ग्रामीण भागांतही विकला जाऊ लागला आहे. शोर्मा हे मध्यपूर्व भागातील लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. या पदार्थाचा शोध तुर्कीमध्ये लागल्याचे मानले जाते.ओटोमन साम्राज्यादरम्यान अरब प्रदेशातील लेव्हंट प्रदेशात पहिल्यांदा शोर्मा तयार केल्याचेही मानले जाते, पारंपारिकरित्या हा पदार्थ कोकराच्या मांसापासून तयार करण्यात येत होता. कालांतराने चिकन, टर्की, गोमांस किंवा वासराचे मांस वापरण्यात येऊ लागले. भारतात विकला जाणारा शोर्मा चिकन पासून बनवला जातो असे मानले जात असले तरी यामध्ये कोणते मास वापरले जाते याबाबत कुठेही खात्री केली जात नाही. काही दिवसांपूर्वी चिकन मोमोजमध्ये कुत्र्याचे मांस वापरण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे रस्त्यालगत मिळणाऱ्या शोर्मासाठी वापरण्यात येणाऱ्या मांसामध्येही अशा प्रकारची भेसळ केली जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२०२३ मध्ये केरळातील एका तरुणाचा शोर्मा खाल्यामुळे विषबाधा होऊन मृत्यू झाला होता. मानखुर्दमध्ये हल्लीच प्रथमेश घोक्षे नावाच्या तरुणाचा रस्त्यावरील शोर्मा खाल्यामुळे विषबाधा होऊन मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आनंद कांबळे आणि महंमद अहमद रेजा शेख यांना अटक करून गुन्हा नोंदवला. काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथेही शोर्मातून १२ जणांना विषबाधा झाली . मांसापासून बनवल्या जाणाऱ्या शोर्मा आणि मोमोजची रस्त्यालगत सर्रासपणे अवैध विक्री केली जात आहे. असे पदार्थ आरोग्याला हानीकारक असूनही स्थानिक प्रशासनाकडून त्यांवर कारवाई होत नाही. याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून आरोग्यमंत्री, तसेच अन्न आणि औषध प्रशासनमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. अशा प्रकारे उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणार्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांनी कारवाई करावी आणि त्याचा अहवाल आरोग्य विभागाला पाठवावा. यामध्ये दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी तक्रारीमध्ये केली आहे. २४ तासानंतर शोर्मा या पदार्थामध्ये मानवी प्रकृतीला हानीकारक द्रव्ये निर्माण होतात. त्यातील मांस कधीपर्यंत टिकाऊ आहे, याची कालमर्यांदा देण्यात येत नाही. कालबाह्य मांस खाल्ल्यामुळे त्यातून विषबाधा होण्याची शक्यता असते. शोर्मा खातांना त्यावर ‘मेयॉनीझ’ हा पांढर्या रंगाचा ‘सॉस’ वापरला जातो. अंड्यातील बलक वापरला जातो. तो योग्यरित्या साठवला जातो का, याविषयी शाश्वती नसते. मोमोजमध्ये वापरण्यात येणारे ‘आजोडिकार्बोनामाईड’ आणि ‘बेझॉईल पॅरॉक्साईड’ हे शरिरासाठी हानीकारक आहे. यातून मधुमेहासारखे विकार बळावत आहेत. यासारख्या मुद्यांचा या तक्रारीमध्ये ठळकपणे उल्लेख करण्यात आला आहे. अशा प्रकारे उघड्यावर होणार्या मांसाहारी खाद्यपदार्थांमुळे सामाजिक स्वास्थ्य वेठीस धरले जात आहे. त्यामुळे कुणाच्या तक्रारीची वाट न पहाता प्रशासनाने यांवर स्वत:हून कारवाई करावी, अशी मागणी श्री. मुरुकटे यांनी सुराज्य अभियानाद्वारे केली आहे.
रस्त्यावरील स्टॉल्सवर खाद्यपदार्थ विकताना बऱ्याचदा स्वच्छता राखली जात नाही. मांसापासून बनवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या बाबतीत जी काळजी घेतली पाहिजे, मांस साठवण्यासाठी जी उपकरणे असायला हवीत ती रस्त्यावरील स्टॉल्सवर असतातच असे नव्हे. अशा ठिकाणी अधिक काळ मांस बाहेर राहिल्यामुळे त्यातून विषबाधा होण्याची शक्यता बळावते. २०२२ मध्ये केरळमध्ये शोर्मा खाल्यामुळे विषबाधा झाल्याची घटना घडल्यानंतर तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांनी खाद्यपदार्थ विकणाऱ्या राज्यभरातील स्टॉल्सची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. ज्या स्टॉल्सवर अन्नपदार्थ ठेवण्यासाठी आणि साठवण्यासाठी आवश्यक सुविधा नसतील अशा १००० स्टॉल्स आणि दुकानांवर यावेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. आपल्याकडे अशा प्रकारची कारवाई केव्हा होणार ? शाळकरी मुले आणि तरुणांमध्ये दैनंदिन खाण्यात ‘जंक फूड’चे वाढते प्रमाण खरेतर चिंतेचा विषय आहे. ’जंक फूड’च्या अति सेवनाने शरीरातल्या इन्सुलिनची पातळी मर्यादेपेक्षा अधिक वाढते आणि व्यक्तीची प्रतिसाद देण्याची शक्ती हळूहळू मंदावू लागते. मुलांच्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक वाढीवर हे पदार्थ विपरीत परिणाम करतात. लहान वयातच हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा असे विविध आजार ‘जंक फूड’च्या नियमित सेवनाने जडू शकतात. ‘हृदयविकार, मधुमेह, रक्
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई