जत : कोलकाता येथील तरुणी डॉक्टरवर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणात न्याय मिळण्याआधीच महाराष्ट्रात आणखी एक निर्दय घटना घडली. बदलापूर येथील शाळेमध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या क्रूर अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक आहे.या अत्याचाराच्या निषेधार्थ आज जतमध्ये निषेध पदयात्रा काढत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
कोलकाता येथील आरजीकल मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे.त्याचबरोबर बदलापूर येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रकार उघडीस आला आहे. या दोन्ही घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले आहेत. या घटनाच्या निषेधार्थ वैद्यकीय क्षेत्रात जोरदार आवाज उठविला जात आहे.गुरूवारी जत शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थीनी रस्त्यावर उतरल्या,शहरातील मुख्य मार्गावरून निषेध मोर्चा काढण्यात आला.स्टँडनजिक आंदोलन विद्यार्थ्यांनीचे निवेदन प्रशासनाकडून स्विकारण्यात आले.
या पदयात्रेत शहरातील सर्व विद्यालयातील मुली,शिक्षकासह आमदार विक्रमसिंह सावंत हेही सामील झाले होते.जत शहरातील प्रमुख मार्गावर यामुळे मोठी गर्दी झाली होती.या पदयात्रेत शाळकरी मुलींनी मोठा सहभाग नोंदविला.
महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अपहरण आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ थांबवण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत पीडितेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
आमची मागणी आहे की, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवले जावे आणि त्या अपराध्याला लवकरात लवकर कडक शिक्षा मिळावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.