येळवीत महिलेस केबलने मारहाण
जत,संकेत टाइम्स : सुनेला घरी परत आणतो म्हणून मध्यस्ती करून दहा हजार रूपये घेऊनही सुनेला परत आणले नाही म्हणून गावातील पंचमंडळीत वाद मिटविताना तक्रारदार विठाबाई यशवंत खांडेकर यांना संशयित गोरख सोपान वगरे,गणेश गोरख वगरे यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वगरे पिता पुत्राविरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, येळवी येथील विठाबाई खांडेकर यांचा मुलगा गणेश व त्यांच्या पत्नीत किरकोळ वाद झाल्याने पत्नी माहेरी गेली आहे. तो वाद मिटवून पत्नीला परत आणण्यासाठी गोरख वगरे यांनी दहा हाजार रूपये घेतले होते.

मात्र बरेच दिवस त्यांनी फिर्यादीच्या सुनेला परत आणले नाही.म्हणून फिर्यादी विठाबाई या गावातील संरपच पोलीस पाटील यांच्याकडे तक्रार घेऊन गेल्या होत्या.त्यांनी गावात बैठक बोलविली होती.त्यावेळी वगरे पितापुत्र दोघेही उपस्थित होते.दरम्यान चर्चा सुरू असताना गोरख वगरे व गणेश वगरे यांनी सोबत आणलेल्या केबलने अचानक फिर्यादी विठाबाई खांडेकर यांना माझी बदनामी करतेस का? म्हणून मारहाण करण्यास सुरूवात केली.तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी विठाबाई यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे.
