मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र | रोहित पाटील : आर.आर.पाटील यांनीही अशाच प्रकारे बदनाम केले जात होते

0
188

दोन – तीन दिवसांपूर्वी मतदारसंघात फराळ कोण वाटत होते : रोहित पाटील यांचा सवाल

   तासगाव येथील पैसे वाटप प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. विनाकारण मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. स्व. आर. आर. पाटील यांनाही अशाच प्रकारे बदनाम केले जात होते. त्यांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडकवून त्यांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न होत होता, अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली आहे. तर तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोण फराळ वाटप करत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.

 
 तासगाव येथील साठेनगर भागात काहीजण दिवाळीचा फराळ व प्रत्येक कुटुंबात 3 हजार रुपयांचे एक पाकीट वाटप करत असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार चव्हाट्यावर आणला. त्यानंतर पैसे वाटप करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात आणले. 

  
तत्पूर्वी त्यांचा एक व्हिडिओ करण्यात आला. या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांच्यासाठी हे पैसे वाटप करत असल्याचे सांगत आहे. सुमारे 227 जणांची यादी करण्यात आली आहे. त्यातील 100 लोकांना 3 हजार रुपये प्रमाणे पैसे वाटप करण्यात आले आहेत. तर उर्वरित कुटुंबांमध्ये अजून वाटप करायचे आहे, असेही या व्हिडिओत सांगण्यात येत आहे. यावरून राज्यभरात खळबळ उडाली आहे. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील पैसे वाटप करून मतदान मिळवत आहेत, असा आरोप होऊ लागला आहे.


 दरम्यान, याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पाटील म्हणाले, मतदारसंघात गेल्यात दोन-तीन दिवसांपासून कोण फराळ वाटप करत आहे, हे लोकांना माहित आहे. तासगाव येथील प्रकरणात मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. बिनकामाचे माझं नाव या प्रकरणामध्ये गोवले जात आहे. पूर्वीसुद्धा आर. आर. पाटील यांना अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडकवून त्यांची बदनामी केली जात होती. निवडणूक काळामध्ये सगळी प्रक्रिया डिस्टर्ब करण्याचे काम विरोधक करत होते. त्यांची ही जुनी पद्धत आहे.

 


 ते म्हणाले, ज्या पद्धतीने तासगाव येथील त्या व्यक्तीला एका बोलेरो गाडीमध्ये बसवून त्याचा व्हिडिओ करण्यात आला, त्यामध्ये स्पष्टपणे असे दिसते की, त्याच्यावर दडपण टाकण्यात आले. त्याच्यावर दबाव टाकून हा व्हिडिओ करण्यात आला आहे. हे पाहता संबंधितांनी माझं नाव घ्यायला लावले आहे, असे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

 



दरम्यान गेल्या दोन-तीन दिवसांपासून तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात नेमकं कोण फराळ वाटप करत आहे, याची चर्चा आहे. हे सगळं उघडकीस येईल या भीतीने विरोधकांनी षडयंत्र रचून आजचा प्रकार केला आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. मीही पोलिसांना निपक्षपातीपणे चौकशी करण्याची विनंती केली आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here