विक्रम ढोणे यांच्या पाठपुराव्याला यश
शिक्षणाधिकाऱ्यांच्या लेखी आदेशानंतर दीड महिन्याने कार्यवाही
जत : नियमित केंद्र प्रमुखांकडे प्रशासकीय कारणास्तव व सोयीसाठी मुख्याध्यापक, विषय शिक्षक यांच्याकडे देण्यात आलेला केंद्र प्रमुख पदाचा अतिरिक्त कारभार तात्काळ रद्द करण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या लेखी आदेशानंतर तब्बल 48 दिवसांनी रद्द करण्याचे काम जत पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांनी केलं.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी तात्काळ अतिरिक्त कार्यभार रद्द करण्याचे आदेश देऊनही जत पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी फक्त कागदोपत्री घोडे नाचवले होते पण प्रत्यक्षात आदेश रद्द केला नव्हता.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने युवा नेते विक्रम ढोणे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना जिल्हा परिषदेत जाऊन कार्यवाही करण्याचे निवेदन दिले होते.
त्यानंतरही कार्यवाही केली नव्हती तेंव्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे जत पंचायत समितीच्या आढावा बैठकीसाठ आल्यानंतर ही बाब युवा नेते विक्रम ढोणे यांनी निवेदनाव्दारे निदर्शनास आणून दिल्यानंतर कागदोपत्री रद्दचे आदेश तयार करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात आदेश दिले नव्हते. त्यामुळे युवा नेते विक्रम ढोणे यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेत 13 जानेवारी रोजी तब्बल 48 दिवसांनी अतिरिक्त कार्यभार रद्दचा आदेश संबंधितांना देण्यास जत शिक्षण विभागाला भाग पाडले.
शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचा आदेश 25 नोव्हेंबर 2024 रोजीचा जत पंचायत समितीची टिपणी 29 नोव्हेंबर,आदेश तयार 29 नोव्हेंबर, जावक रजि.नोंद 20 डिसेंबर आणि प्रत्यक्षात आदेश शिक्षकांच्या हातात 13 जानेवारी 2025 रोजी 48 दिवसानंतर मिळाले.जत शिक्षण विभागाच्या गतिमान कारभाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.प्राथमिक शिक्षकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू असल्याने शिक्षकांच्या प्रशासकीय कामकाजाची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असून तक्रारही करता येत नाही कारण शिक्षण विस्तार अधिकारी आणि गट शिक्षणाधिकऱ्यांच्या हाताखाली प्राथमिक शिक्षकांना कामकाज करावे लागते. कामकाजाची तक्रार केल्यास सर्व्हिस बुकला चुकीचे शेरे मारतील या भीतीने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू आहे.