आता तालुकास्तरावर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत शासकीय व खाजगी रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन वापराव्या लागणाऱ्या रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. वृध्द, दम्याचे किंवा हृदय रोगाचे रूग्ण अशा काही कोविड रूग्णांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सुध्दा ऑक्सिजनची गरज काही प्रमाणात लागतच राहते. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन हवेतील ऑक्सिजन घेवून त्याचे शुध्दीकरण करून रूग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देत असल्यामुळे त्यास सिलेंडरची गरज भासत नाही. त्यामुळे अशा मशिन हॉस्पीटल अथवा घरगुती वापर या दोन्ही ठिकाणी वापरल्या जात आहेत.
सदर मशिन शासन स्तरावरून आणि दानशूर व्यक्तींमार्फत सीएसआर मार्फत उपलब्ध होत आहेत. त्या तालुकास्तरावर एकत्रित साठा पध्दतीने ठेवून नागरिकांना वापरण्यास देण्याचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक तयार करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
ऑक्सिजन देण्यासाठी सिलेंडर आणि कॉन्सन्ट्रेटर मशिन या दोन प्रणालींचा उपयोग सद्या केला जात आहे. ऑक्सिजन वायूचे व्यवस्थापन, वाहतूक उपलब्धता इत्यादी बाबींचे काटेकोर नियोजन सातत्याने करावे लागते. त्यादृष्टीने या तालुकास्तरावरील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक महत्त्वपूर्ण ठरतील, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.

तालुकास्तरावर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक स्थापन करत असताना तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सीएसआर मार्फत उपलब्ध होणाऱ्या मशिनचा साठा उपजिल्हा अथवा ग्रामीण रूग्णालयांमध्ये करण्यात यावा. या परिसरामध्ये जागा अपूरी पडत असल्यास तहसिलदारांच्या सहाय्याने जवळची एखादी इमारत उपलब्ध करून घेवून साधारणत: एका तालुक्यात 50 ते 75 मशिन या बँकेकडे उपलब्ध होतील असे नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
