कोरोना रुग्णांच्या सहाय्यासाठी आता तालुकास्तरावर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक ; जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी | आतापर्यंत जिल्ह्याला 76 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्राप्त
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत शासकीय व खाजगी रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन वापराव्या लागणाऱ्या रूग्णांचे प्रमाण वाढत आहे.
वृध्द, दम्याचे किंवा हृदय रोगाचे रूग्ण अशा काही कोविड रूग्णांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सुध्दा ऑक्सिजनची गरज काही प्रमाणात लागतच राहते.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन हवेतील ऑक्सिजन घेवून त्याचे शुध्दीकरण करून रूग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देत असल्यामुळे त्यास सिलेंडरची गरज भासत नाही. त्यामुळे अशा मशिन हॉस्पीटल अथवा घरगुती वापर या दोन्ही ठिकाणी वापरल्या जात आहेत. सदर मशिन शासन स्तरावरून आणि दानशूर व्यक्तींमार्फत सीएसआर मार्फत उपलब्ध होत आहेत. त्या तालुकास्तरावर एकत्रित साठा पध्दतीने ठेवून नागरिकांना वापरण्यास देण्याचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक तयार करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
ऑक्सिजन देण्यासाठी सिलेंडर आणि कॉन्सन्ट्रेटर मशिन या दोन प्रणालींचा उपयोग सद्या केला जात आहे. ऑक्सिजन वायूचे व्यवस्थापन, वाहतूक उपलब्धता इत्यादी बाबींचे काटेकोर नियोजन सातत्याने करावे लागते. त्यादृष्टीने या तालुकास्तरावरील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक महत्त्वपूर्ण ठरतील, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.
तालुकास्तरावर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक स्थापन करत असताना तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सीएसआर मार्फत उपलब्ध होणाऱ्या मशिनचा साठा उपजिल्हा अथवा ग्रामीण रूग्णालयांमध्ये करण्यात यावा. या परिसरामध्ये जागा अपूरी पडत असल्यास तहसिलदारांच्या सहाय्याने जवळची एखादी इमारत उपलब्ध करून घेवून साधारणत: एका तालुक्यात 50 ते 75 मशिन या बँकेकडे उपलब्ध होतील असे नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
पंचायत समिती गटविकास अधिकारी हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेचे नोडल अधिकारी राहतील. सदर मशिनसाठी तालुक्यातील सर्व मागणी अर्जांची नोंदणी करून घेवून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत मागणी करणाऱ्या संबंधितांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेकडे पाठवावे. तालुक्यातील सर्व गरजू लाभार्थींना या मशिन्स उपलब्ध होतील, याचा वापर योग्य पध्दतीने, योग्य प्रमाणात होईल याचे संनियंत्रण करावे. सदर मशिनचा उपयोग होत असल्याबाबत खातरजमा करावी व वापर संपल्यानंतर संबंधितांनी त्या परत कराव्या यासाठी यंत्रणांनी पाठपुरावा करावा. असेही जिल्हाधिकारी यांनी सूचित केले आहे.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक तालुक्यातील उपजिल्हा रूग्णालये किंवा ग्रामीण रूग्णालये येथे स्थापित करण्यात येईल व त्याचे प्रमुख कार्यवाहक हे वैद्यकीय अधिक्षक असतील. मशिन देतेवेळी व घेतेवेळी त्या सुस्थितीत आहेत किंवा नाहीत याबाबत खातरजमा करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
सदर मशिन्स वापरण्यास देण्यापूर्वी तालुक्यातील शासकीय अथवा खाजगी डॉक्टरांची त्याबाबत शिफारस असणे आवश्यक केले आहे. गरजेपेक्षा जास्त दिवस मशिन रूग्णाच्या घरी पडून राहणार नाही किंवा परस्पर इतर रूग्णांसाठी वापरल्या जाणार नाहीत याची खबरदारी वैद्यकीय अधिक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी घेण्याची आहे.
सदर मशिनची देवाण घेवाण करताना संबंधित अर्जातील रूग्णाचे नाव, मागणी करणाऱ्या नातेवाईकांचे नाव, मोबाईल नंबर व आधार कार्ड किंवा ओळखपत्रातील नावाची खात्री करूनच मशीन ताब्यात देण्यात येईल. तांत्रिक बिघाड वगळता मशिनची मोडतोड झाल्यास त्याची जबाबदारी मशिन घेवून जाणाऱ्या नातेवाईकांची राहील. सदर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेचे काम सुरळीत चालावे यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा किंवा मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी तहसिलदार मदत तसेच संनियंत्रण करतील, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत जिल्ह्याला 76 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्राप्त
जिल्ह्याला बिईंग ह्युमन फाऊंडेशन यांच्याकडून 25, स्वस्थ अॅण्ड ॲक्ट ग्रॅण्ड फाऊंडेशनकडून 30 , उपसंचालक कार्यालय कोल्हापूर व सीएसआर फंड (श्री. सुहास देशपांडे) यांच्याकडून 21 असे एकूण 76 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्राप्त झाले आहेत. हे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशिन ग्रामीण रूग्णालय आटपाडी 11, जत 10, कडेगाव 5, विटा 5, पलूस 10, तासगाव 10, उपजिल्हा रुग्णालय शिराळा 10, उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर 5, उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ 10, यांना वितरीत करण्यात आले आहेत.
