आष्टा : वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी परिसरात केबल वायर चोरी करणाऱ्या टोळीचा आष्टा पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी मोटारसायकलसह विविध कंपन्यांची केबल वायर असा सुमारे ६४ हजार ६३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
१९ ऑगस्ट रोजी रात्री वारणा नदीपात्रातील बहादूरवाडी हद्दीत केबल चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत तानाजी पांडुरंग जगताप यांच्यासह अन्य संशयितांची नावे निष्पन्न झाली.
तपासादरम्यान याच पद्धतीचा आणखी एक केबल चोरीचा गुन्हाही उघडकीस आला. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक अमर कोरे व पथकाने सहभाग घेतला. पुढील तपास आष्टा पोलिस करीत आहेत.




