जत : मायथळ (ता.जत) येथील सोलनकर वस्तीवर मंगळवारी (दि. ५) सकाळी विवाहित महिलेने आपल्या १८ महिन्यांच्या मुलीसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. नीता गजानन सोलनकर (वय २९) आणि अवनी गजानन सोलनकर (वय १८ महिने) अशी मृतांची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, नीता आणि त्यांचे पती गजानन यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाल्याची माहिती पोलिस व नातेवाईकांकडून मिळाली. त्यानंतर नीतांनी मुलगी अवनी हिला ओढणीने स्वतःसोबत बांधून विहिरीत उडी घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन सांगलीच्या विशेष बचाव पथकाला पाचारण केले. पथकाने विहिरीत बचावकार्य सुरू केले. घटनेमुळे सोलनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत माहेरच्या नातेवाईकांकडून पोलिसांत तक्रार दाखल झालेली नव्हती. त्यामुळे घटनेबाबत अधिकृत गुन्हा नोंद झालेला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.



