सांगली : शामरावनगर येथील दफनभूमीसाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाच्या सुमारे २४ कोटी रुपयांच्या खर्चावरून सांगली महापालिकेत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणातील निधी आपल्या किंवा नातेवाईकांच्या खात्यावर जमा झाल्याचे पुरावे दाखविल्यास आपण तत्काळ राजीनामा देऊ, असे आव्हान मंगेश चव्हाण यांनी दिले.
चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, ३ मार्च २०२३ रोजी दफनभूमीसाठीच्या भूसंपादनाबाबत सुमारे २४.२० कोटी रुपयांचा ठराव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आला होता. त्यावेळी तत्कालीन स्थायी समिती सभापती आणि विद्यमान महापौर धीरज सूर्यवंशी यांची या ठरावावर स्वाक्षरी असल्याचा दावा त्यांनी केला.
भूसंपादनासाठी एकूण रकमेपैकी ३० टक्के म्हणजे ७.२६ कोटी रुपये जमा करण्याबाबत भूसंपादन अधिकाऱ्यांनी कळविले होते. त्यानुसार धनादेश संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, दफनभूमीच्या जागेची किंमत पूर्वी १० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात असताना ती २४ कोटी रुपयांपर्यंत कशी पोहोचली, असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. या प्रकरणातील आरोप सिद्ध न झाल्यास महापौर धीरज सूर्यवंशी यांनीही राजीनामा देण्याची तयारी दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले.
या आरोपांवर महापौरांची भूमिका काय आहे, याकडे आता लक्ष लागले आहे.




