तिघे ताब्यात
सांगली : शहरातील गोकुळनगर परिसरात सोमवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास रेकॉर्डवरील तरुणाचा धारदार कोयत्याने वार करून खून करण्यात आला. गौरव दयानंद सर्जे (वय २२, रा. टिंबर एरिया) असे मृताचे नाव आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, गौरव सर्जे याच्यावर यापूर्वी मारहाणीसह विविध गुन्हे दाखल होते. त्याच्यावर हद्दपारीची कारवाईही करण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी तो गोकुळनगर परिसरातून जात असताना चौघा हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. धारदार कोयत्याने त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेला गौरव रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला.
हत्येची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून तपास सुरू केला. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारावकर, उपअधीक्षक संदीप भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. रात्री उशिरा तिघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन महिन्यांपूर्वीच्या खुनाचा बदला?
गोकुळनगर परिसरातील चैतन्य देवा तोरणे याचा दोन महिन्यांपूर्वी स्वामी समर्थ घाट परिसरात कोयत्याने वार करून खून झाला होता. या घटनेचा बदला घेण्यासाठी गौरवचा खून झाल्याची प्राथमिक चर्चा परिसरात आहे. मात्र, या हत्येमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, घटनेनंतर परिसरातील दुकाने व घरे बंद करण्यात आली. रस्त्यावर नागरिकांची गर्दी झाली होती. घटनास्थळावर मयताचे केस, मोबाईल आणि चप्पल आढळून आली. सीसीटीव्हीमध्ये हल्ल्याची घटना कैद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्याआधारे इतर संशयितांचा शोध सुरू आहे. संभाव्य टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर गोकुळनगर परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.




