शिक्षकांना जीपीएफ खात्यातून पैसे काढण्यास मंजुरी द्या ; दिगंबर सावंत
जत,संकेत टाइम्स : शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जीपीएफ खात्यातून पैसे काढण्यास निर्बंध घातलेले आहेत, ते कमी करावेत,अशी मागणी शिक्षक भारतीने केली असल्याची माहिती जत तालुका शिक्षक भारती अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी दिली.
गेली दोन महिने पगार वेळेवर होत नाहीत कोविड महामारीत अनेक शिक्षक व कर्मचारी यांनी ड्युटी करावी लागत आहे. अनेकांना कोविडची लागण होत असून त्यासाठी वैद्यकीय उपचारासाठी पुरेशी मदत मिळत नाही.तसेच काही शिक्षकांनी घरे,शेतीकामे सुरू आहेत,यासाठी पैशाची नितांत गरज असताना स्वतः च्या हक्काचे पैसे काढण्यासाठी निर्बंध घातले जात आहेत,याचा शिक्षक भारती निषेध करते.स्वतःच्या हक्काचे फंडातील रकमा आपल्याला गरज असेल तेव्हा काढता येतील,या भावनेने फंडामध्ये पैसे ठेवलेले असतात.मात्र आता तेच मिळत नाहीत. त्यामुळे शिक्षकात नाराजी पसरली आहे.

शिक्षकांना स्वतःच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत ते लवकर देण्याची प्रक्रिया सुरू करावी,यासाठी आमदार कपिल पाटील यांनी वित्त सचिव व शिक्षण आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे.यावेळी नवनाथ संकपाळ,मल्लया नांदगाव,बाळासाहेब सोलनकर,अविनाश सुतार,जितेंद्र बोराडे,विनोद कांबळे इ. उपस्थित होते.