जत शहरात निर्बंध ढाब्यावर | पोलीसाचा नाकर्तेपणा ; व्यापारी पेठा,भाजी मंडईत गर्दी
जत,संकेत टाइम्स : जत शहरात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.गुरूवार पासून निर्बंध लावले असूनही जत शहरात गर्दी नियत्रंणात आणण्यात जत पोलीस अपयशी ठरले असून ठाण्याचा प्रमुख व कर्मचारी बेफीकीर असल्याने शहरात सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत.नागरिक,तरूण रस्त्यावरून थेट टोळके टोळक्याने फिरत आहेत.
त्याला मज्जावही जत पोलीस करत नाहीत,हे कसले निर्बंध व अंमलबजावणी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.यात बदल न झाल्यास जिल्हा पोलीस प्रमुख गेडाम यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती,रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी दिली.
कडक निर्बंध असतानाही जत शहरात नागरिक आणि व्यापारी जीवनावश्यक वस्तूच्या नावाखाली कोरोनाचे घालून देण्यात आलेले नियम तोडत आहेत.
त्यामुळे कोरोनाचा धोका भविष्यात अधिक वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.संचारबंदी, लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आले असताना लोक नियम मोडत आहेत.त्यामुळे जत शहरात सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले आहेत. पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत.पोलीसाचा नागरिकांवर वचक राहिला नाही,असे सध्याचे चित्र आहे.तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष घालून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावे,अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिनांक 15 एप्रिल 30 एप्रिल पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ब्रेक दी चेन अशा प्रकारचे लॉकडाऊन चालू केले आहे. मार्चपासून कोरनाचा संसर्ग जादा प्रमाणात वाढू लागल्याने लोकांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा वगळून जनतेच्या हितार्थ हा निर्णय घेतलेला आहे परंतु जत शहरांमध्ये पहिल्याच दिवसापासून अक्षरशा फज्जा उडाला आहे.
जत बाजार पेठत सर्वत्र लोकांची ये -जा व भरभरून गर्दी दिसून येत आहे. बऱ्याच लोकांच्या तोंडावरती रुमाल किंवा मास्क बांधलेला दिसून येत नव्हता. या देशातून कोरोना हद्दपार झाल्याच्या अविर्भावात सर्व जनता फिरताना दिसत आहे. किरकोळ भाजी विक्रेते फळविक्रेते ते चहा गाडीवाल्यांचे व्यवसाय हे सर्व व्यवस्थितपणे चालू आहे. कोणत्याही चौकात रस्त्यावर एकही पोलीस दिसून येत नाही.अपवादात्मक कुठेतरी एकदा होमगार्ड मोबाईल बघत बसलेला असतो.

त्यामुळे जत पोलिस स्टेशनकडून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे प्रशासनाने सदर बाबीची गंभीर दखल घेऊन येणाऱ्या पुढील काळात कडक पद्धतीनी अंमलबजावणी करून कोरोनाचा संसर्ग व सदरची साखळी तोडण्यासाठी पोलिस यंत्रणा व प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे.
शहरातील विविध बँका किराणा दुकान व भाजी मार्केटमध्ये तोबा गर्दी दिसून येत आहे.जीवनावश्यक वस्तूच्या नावाखाली लोकांना कोरोनाचे गांभीर्य लक्षात येईना असे चित्र निर्माण झाले आहे.
शहरातील रुग्ण संख्या दीडशेवर पोहचली असतानाही मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे भान नागरिकांमध्ये रहात नाही अशी परिस्थिती आहे.
जत शहरातील महाराणा प्रताप चौकात गुरूवारी तरूणांचे दोन गट एकमेकांना भिडले होते.तब्बल अर्धा तास दोन्ही गटात हाणामारी सुरू होती.त्यामुळे जवळपास दोनशेवर नागरिकांचा जमाव जमला होता.हाणामारी नंतर सर्वत्र पांगापाग झाल्यावर पोलीस पोहचले.मात्र तोपर्यत जमावबंदी आदेश पायदळी तुडविला गेला होता.खरेतर प्रमुख चौक असतानाही येथे एकही पोलीस सुरक्षेसाठी तैनात नव्हता,यामुळे जत पोलीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश पाळत नाहीत काय?असा काहीसा प्रश्न शहरात उपस्थित झाला आहे.
जत शहरात स्टँडजवळ झालेली तूफान गर्दी पोलीसाचे नियंत्रण सुटल्याचे स्पष्ट करत आहे.