बंधिस्त पाईपलाईन खा.संजयकाका पाटील यांनी राबविलेली योजना ; प्रकाश जमदाडे यांची माहिती
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील वंचित गावांना शेती व पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी वचिंत 65 गावासाठी भाजपा सरकार काळात विस्तारित योजना सादर केली आहे.या शाश्वत योजनेसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत,अशी माहिती रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली.
जमदाडे म्हणाले,वास्तविक पाहता 1995 साली म्हैशाळ योजनेतून जत तालुक्यातील 22,400 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन 16 लघु पाटबंधारे तलाव,संख आणि दोडडनाला हे मध्यम प्रकल्प भरून देणेची तरतूद होती, परंतु आज तागायत यातील फक्त 25 टक्के काम पूर्ण झाले आहे.गेल्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये मिरज,कवठेमहांकाळ आणि तासगाव या तालुक्यात राजकीय प्रभावामुळे अनेक नवीन योजना मंजूर केल्या व पूर्णही केल्या आहेेत.परंतु जत तालुक्यात प्रबळ राजकीय इच्छाशक्ती अभावी आजही मूळ योजना अपूर्ण आहे, हे तालुक्याचे दुर्देव आहे.
खासदार संजयकाका पाटील कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष झालेनंतर म्हैशाळ योजनेचा प्रधानमंत्री सिंचन योजनेमध्ये समावेश करून जत तालुक्यातील अनेक गावांना पाणी पोहचविण्यासाठी 178 कोटी खर्च करून 438 किमी लांबीमध्ये वेगवेगळ्या व्यासाच्या बंधिस्त पाईपलाईन मधून पाणी देऊन जत तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्याचे प्रयत्न करत आहेत.

खासदार संजयकाका पाटील आणी आमदार विलासराव जगताप यांनी पूर्णतः 48 व अंशतः 17 गावे या साठी 7 मार्च 2019 रोजी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून म्हैसाळ विस्तारित योजना सादर केली.या योजनेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यताही दिली परंतु त्यानंतर आम्ही वारंवार पाठपुरावा करतो.परंतु आजही या जत तालुक्याच्या शाश्वत योजनेसाठी कोणतेही हालचाल दिसत नाही,हे दुर्देव आहे.
बंदिस्त पाईपलाईनची योजना ही खासदार संजयकाका पाटील यांची आहे.जत तालुक्यातील 125 महसूल गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देणे आणि 2,92,000 लोकांना स्वच्छ, शुद्ध आणि मुबलक पिण्याचं पाणी देण यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून नामदार जयंत पाटील ,कै.पतंगराव कदम,कै.आर.आर.आबा,खासदार संजयकाका पाटील व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे.राजकीय स्टंटबाजी न करता शेतकऱ्यांच्या शेतात येणाऱ्या पाण्याला कोणत्याही पक्षाचा रंग नाही ते पाणीच आहे हे नेत्यांनी लक्षात ठेवावे,असे आवाहनही जमदाडे यांनी केले आहे.