पुढील काळ कोरोनाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी | जिल्ह्यात 227 ठिकाणी लसीकरण सुविधा उपलब्ध

0सांगली : 1 एप्रिल पासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू केलेले आहे. जिल्ह्यात 111 आरोग्य केंद्रावरून लसीकरण सुरू असून यामध्ये आजपासून आणखी 116 लसीकरण केंद्रांची भर पडली आहे. जिल्ह्यात 227 केंद्रावरून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पुढील 15 ते 20 दिवसांचा कालावधी हा कोरोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असून 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी त्वरीत लसीकरण करून घ्यावे व पुढील धोका टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.


जिल्ह्यातील कोरोना स्थिती व लसीकरण याबाबत माहिती देत असताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील आदि उपस्थित होते.

कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत असून येणारा कालावधी हा कोरोनाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. शासनाने 45 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील या वयोगटातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर कोरोना होण्याची शक्यता अत्यल्प आहे. तसेच प्रादुर्भाव झाला तरी कोरोनाची तीव्रता या लसीकरणामुळे कमी होवून पर्यायाने पुढील संभाव्य अप्रिय घटना व धोके टाळण्यासाठी लसीकरणामुळे निश्चितच मदत होते, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. याबरोबरच त्यांनी स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनीच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधणे या बाबींचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे.


ज्या जिल्ह्यामध्ये लसीकरणाचा वेग जास्त आहे, त्या जिल्ह्यांना आवश्यक लसींचे डोसेसही शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्ह्यात 45 वर्षावरील सुमारे 6 लाख 30 हजार नागरिक असून या सर्वांच्या लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्नशील आहेच परंतु याबरोबरच सामाजिक संस्थांनीही या वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी उद्युक्त करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत 2 लाख 430 कोविड लस प्राप्त झाल्या असून यापैकी 1 लाख 73 हजार 430 कोविशिल्ड तर 27 हजार कोव्हॅक्सीन लस आहेत. जिल्ह्यातील 1 लाख 42 हजार 218 जणांचा पहिला डोस तर 17 हजार 974 जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

Rate Card

मास्क न वापरणाऱ्या व कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून 20 फेब्रुवारी ते मार्च अखेर जिल्ह्यात 40 लाख 90 हजार रूपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. तर महानगरपालिका क्षेत्रात 5 लाख 68 हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आल्याची माहिती देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, दंड वसुल करणे हे प्रशासनाचे उद्दिष्ट नसून नागरिकांची सुरक्षा हेच अंतिम उद्दिष्ट आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्देशित करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोर पालन करा.


जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट जानेवारी 2021 पासून 3.28 असून येत्या काळात कोरोना प्रादुर्भाव वाढणार हे निश्चित असल्याने शासकीय रूग्णालयांबरोबरच खाजगी रूग्णालयेही कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी कार्यान्वीत करण्यात येत आहेत. तसेच महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नीत असणारी हॉस्पीटलही पुन्हा कार्यान्वीत करण्यात येत आहेत. 


सद्यस्थितीत  जिल्ह्यात  भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय सांगली, कुल्लोळी हॉस्पीटल सांगली, मिरज चेस्ट सेंटर मिरज, वाळवेकर हॉस्पीटल सांगली, विवेकानंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर बामणोली ता. मिरज, मेहता हॉस्पिटल टिंबर एरिया सांगली, वॉन्लेस हॉस्पिटल मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज  या ठिकाणी उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजन साठा व बेड्सही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. पण असे असले तरी उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला हे लक्षात घेवून लसीकरण करून घ्यावे. लसीकरणासाठी जाताना कोणतेही फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी) घेवून जावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.00000

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.