आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आ.सांवत यांच्यावर गुन्हा दाखल करा ; माजी आमदार विलासराव जगताप यांची मागणी
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यांची आचारसंहिता सुरू असताना या निवडणुकीत ज्या ग्रामपंचायत बिनविरोध जाहीर होतील,त्यांना 30 लाख रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली आहे.या घोषणेमुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यामुळे आमदार सावंत यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.
एकीकडे ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा म्हणायचे आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी पैसे द्यायचे.खोटी आश्वासने देत आ.सांवत जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप माजी आमदार जगताप यांनी केला.आमदार सावंत यांनी आतातरी भंपकपणा बंद करावा.विधानसभा निवडणुकीत तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी देण्याचे आश्वासन देत विधानसभेत निवडून आले. ही योजना पूर्ण होण्यासाठी आंतरराज्य करार होण्याची आवश्यकता आहे,शिवाय या योजनेबाबत दोन्ही राज्ये उदासीन असल्याचे जलसंपदा मंञ्यांनी स्पष्ट केल्याचेही जगताप म्हणाले.पावसाचे पाणी जत पूर्व भागातील काही तलावात आले असताना हेच तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी आले असल्याचा कांगावा केला. यावरून त्यांचे अज्ञानपण दिसून येते.
माजी आमदार जगताप म्हणाले की,शासनाचा निधी देण्याचा अधिकार त्यांना नाही.त्या त्या गावात काय काम आहे,हे बघून निधी दिला जातो. हे आमदारांना माहीत आहे.तरीसुद्धा ऐन निवडणुकीच्या कालावधीत प्रलोभने दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.निवडणूक आली की ,जनतेला खोटी आश्वासने देण्यात आमदार सावंत हे पटाईत असल्याचा खोचक टोला माजी आमदार जगताप यांनी लगावला.