जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात 30 ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकी ज्वर शिगेला लागला आहे.ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटले की, गावागावातील संघर्ष अटळ असतो.सध्या कोरोनाचा प्रभाव व अडचणीची परिस्थितीचा विचार करून गावागावामध्ये या निवडणूकीमुळे गट तट निर्माण होऊन कटुता निर्माण होऊ नये म्हणून जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी मोठी घोषणा केली आहे.
आपल्या मतदारसंघातील कोणत्याही ग्रामपंचायतीने येणारी निवडणूक बिनविरोध केली तर त्या ग्रामपंचायतीला आमदार फंड व विविध विकास निधीतून 30 लाखांचा निधी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे आता काही ग्रामपंचायतींनी निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात किती गावातील पुढाऱ्यांना आपल्या गावात विकास व्हावा असे वाटत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तालुक्यात येत्या 15 जानेवारी रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये जत विधानसभा मतदारसंघात एकूण 30 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. या सर्वच 30 ग्रामपंचायतींची आ.सांवत यांनी मोठी घोषणा केली आहे.इतका मोठा निधी मिळवून गावाचा चेहरा मोहरा बदलून शांतता राखत, विकास करा, असे आवाहन सुद्धा आ.सांवत यांनी केले आहे.
गट तट,पक्ष बाजूला ठेवा
ग्रामपंचायत वगळता सर्वच निवडणुका या पक्षीय पातळीवर होत असतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गावामध्ये गट तट निर्माण होऊन एकमेकांमध्ये कटुता निर्माण होत असते. हे टाळण्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करणे अतिशय योग्य पर्याय आहे. यामुळे गावाचा विकास साधण्यास चांगली मदत होते. त्यामुळेच अशा बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतींना आपण स्वतः 30 लाखांचा निधी देणार आहोत. त्यामुळे आता किती गावातल्या पुढाऱ्यांना आपल्या गावाचं भलं व्हावं असं वाटतं हे पाहावे लागणार आहे.
निवडणूक काळात कोरोनाचा फैलाव होऊ नये.कोरोनाशी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनावर अधिकचा ताण येऊ नये,गावामधील राजकीय व सामाजिक सलोखा बिघडू नये, कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडाव्यात,असे आवाहनही आ.सांवत यांनी केले आहे.यासाठी त्यांनी गटनिहाय ग्रामपंचायतीच्या भेटीगाठीही घेणार असल्याचे आ.सांवत यांनी सांगितले.