करजगी,वार्ताहर : करजगी परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनात वाढ व्हावी व आपले जीवनमान उंचविण्याकरिता शेतीला सक्षम करण्यावर भर दिला. या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बोअरवेल तयार केल्या व महावितरणकडे रीतसर अर्ज करुन वीज जोडणी घेतली व रब्बी हंगामातील द्वारा,मका,गहू आदी पिंकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु या परिसरात गावाकरिता आणि शेती पंपाकरिता एकत्र डीपी असल्यामुळे त्या डिपीवर अधिक भार होत असून शेतीपंप चालत नाही.
त्यातच चोरून विज वापरणारी संख्या वाढल्याने अतिरिक्त भार पडून डिपी जळत आहे.तो महावितरणकडून वेळेत दुरुस्थ करून मिळत नाही.तब्बल दहा-पंधरा दिवसापर्यत विज नसल्याने पाणी उपलब्ध असूनही पिके वाळत आहेत.अशीच स्थिती जत तालुक्यातील अन्य गावातही कायम आहे.एकीकडे निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिली आहे. तर दुसरीकडे रब्बीची पिके ऐन भरात असताना महावितरणाचा भोगळ कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.महावितरणच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांना दमबाजी करण्याचे प्रकार होत असून सातत्याने कमी दाबाची विज पुरवठा,डिपी जळण्याच्या तक्रारी वाढत आहेत.प्रत्येक शेतकऱ्यांकडून शेती पंपाकरिता स्वतंत्र डिपी तयार करण्यात यावी, अशी मागणी महावितरणकडे करण्यात आली.
शेतकरी वाचला पाहिजे म्हणून एका बाजूला सरकार नवनवीन योजना राबवतं, तर दुसऱ्या बाजूला मात्र महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे करजगीसह तालुक्यातील अन्य गावातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.तालुक्यात अनेक ठिकाणी पंधरा दिवसांपासून वीज नसल्याने हाताशी आलेलं पीक पंपाने पाणी न दिल्याने कोमजून गेल आहे.वीज महावितरण विभाग शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं आहे.
तालुक्यातील अनेक गावांना विद्युत पुरवठा करणारा ट्रांसफार्मर एमएसईबीचे कर्मचारी घेऊन जातात ते पंधरा पधरा दिवस फिरकत नाहीत.पंधरा दिवसात अनेकवेळा तक्रार करुनही एमएसईबी याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.