आपल्या परंपरेतील अनेक अनमोल ठेवा आंतरराष्ट्रीय टोळ्यांचे शिकार होत राहिला आहे.अशीच एक 100 वर्षांपूर्वीची अन्नपूर्णा देवीची मूर्ती चोरुन कॅनडामध्ये नेली होती ती मूर्ती आता पुन्हा भारतामध्ये येत आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये दिली.भारताचा हा अनमोल ठेवा पुन्हा भारतात येत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. कॅनडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ रेजिनाचे अंतरीम अध्यक्ष तथा कुलगुरु थॉमस चेज हे भारतातील तिथले राजदूत अजय बीसीरिया यांच्याकडे सोपवणार आहेत.देवी अन्नपूर्णाची दुर्मिळ मूर्ती वाराणसीच्या मंदिरातून चोरीला गेली होती. मॅकॅन्झी आर्ट गॅलरीचे संस्थापक नॉर्मन मॅकॅन्झी यांच्या 1913 सालच्या भारत भेटीदरम्यान ही मूर्ती एका मध्यस्थाने त्यांना मिळवून दिली होती.अर्थात ही मूर्ती मिळवण्यासाठी मॅकॅन्झी यांनी त्याकाळी मोठी रक्कम मोजली होती. तेंव्हापासून ही मूर्ती कॅनडाच्या म्युझियममध्ये आहे.या म्युझियममध्ये जगभरातील अनेक प्राचीन आणि दुर्मिळ मुर्त्या आहेत. जगभरातील पर्यटक हे म्युझियम पाहण्यासाठी कॅनडाला भेट देतात.भारतातील जागतिक कीर्तीच्या चित्रकर्मी दिव्या मेहरा यांनी आपल्या होऊ घातलेल्या दुर्मिळ वस्तूंच्या प्रदर्शनासाठी या म्युझियमला भेट दिली तेंव्हा त्यांना ही मूर्ती दिसली.त्यांनी ती ओळखली. ही प्राचीन आणि दुर्मिळ मूर्ती म्हणजे भारताचा अनमोल ठेवा असून तो देशात परत आला पाहिजे असे त्यांना वाटले त्यासाठी त्यांनी जागृती मोहीम राबवली. त्यांनी केंद्र सरकारला यासाठी विंनतीपत्र पाठवली तसेच सोशल मीडियावर देखील मोहीम राबवली. इंडियन अँड साऊथ एशियन आर्ट पीबॉडी एसेक्सचे क्युरेटर डॉ. सिद्धार्थ शहा यांनी देखील ही मूर्ती वाराणसीच्या मंदिरातून चोरी गेलेली प्राचीन आणि दुर्मिळ मूर्तीच असल्याची खात्री पटवली तेंव्हापासून ही मूर्ती भारतात परत आणण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले. कॅनडा आणि भारत हे दोन्ही देशात मौत्रीचे संबंध असल्याने कॅनडा सरकारने ही मूर्ती भारताला देण्याची तयारी दर्शवली. म्युझियमनेही 100 वर्षांपूर्वी झालेली चूक सुधारण्याची तयारी दर्शवून ही मूर्ती भारताला परत करण्यास संमती दिली. त्यामुळे ही अन्नपूर्णा देवीची ही अतिप्राचीन आणि दुर्मिळ मूर्ती भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला. भारतातील अनेक दुर्मिळ वस्तू विदेशातील म्युझियममध्ये आहेत.ब्रिटिश, डच आणि फ्रेंच यांनी भारतात अनेक वर्षे राज्य केली. त्यांच्या वसाहती भारतामध्ये होत्या.भारत सोडून जातांना या देशांनी भारताचा खजिनाच लुटून आपल्या देशात नेला.भारतातील अनेक मौल्यवान, दुर्मिळ वस्तू ,पुरातन मुर्त्या या देशात आहेत.नेदरलँड मधील एका म्युझियममध्ये तर भारतातील एका लाखांहून अधिक दुर्मिळ वस्तू व मुर्त्या आहेत.जगातील सर्वात मौल्यवान आणि दुर्मिळ असलेला कोहिनुर हिरा इंग्लंडमध्ये आहे. टिपू सुलतानाची दुर्मिळ हिरेजडित तलवार आपल्या देशाने इंग्लंडकडून परत आणली असली तरी त्यांचा मौल्यवान वूडन टायगर आजही लंडनच्या म्युझियममध्ये आहे.महाराजा रणजितसिंह यांचा हिऱ्यांनी मढवलेला मुकुट अमेरिक्याच्या ताब्यात आहे. हा सर्व खजिना भारताचा ऐतिहासिक अनमोल ठेवा आहे. केंद्र सरकारने देशाचा हा प्राचीन, दुर्मिळ आणि ऐतिहासिक अनमोल ठेवा परत मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
9922546295