जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची चाळण झाली आहे. पावसाळयात ती अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. जर्मनी, मलेशिया, सिंगापूर, बँकॉक येथील रस्ते 25 वर्षे चालतात. मग आपल्याकडेही हे तंत्रज्ञान का उपयोगात आणले जात नाही. रस्त्यांची पातळी योग्य नसेल तर ‘रस्ते’ बिघडणारच. रस्त्यानेसुद्धा किती ओझे सहन करायचे. रस्त्यांना कधीच उसंत नसते. त्यामानाने त्यांची देखभाल घेण्यात कमतरता आहे. रस्त्यावर पाणी थांबणार नाही, अशी बांधणी असावी.यंदा दहशतवाद्यांपेक्षाही जास्त दहशत निर्माण केली आहे,ती जागोजागी पडलेल्या खड्डय़ांनी.कधी नव्हे इतके बळी खड्डय़ांमुळे गेले आहेत व जात आहेत.
केवळ जतेच नव्हे तर तालुक्यातील सर्वच भागात खड्डे पडले आहेत. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला याबाबत दोष देता येणार नाही. सध्या रस्त्यावर भरमसाठ प्रमाणात वाढलेली वाहनांची संख्या आणि या वर्षी झालेला विक्रमी पाऊस याचादेखील विचार करावा लागेल. त्यामुळेच या दोन शक्यतांचा विचार केला तर सध्याचे तंत्रज्ञान कालबाह्य झाले आहे व रस्तेबांधणीसाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराची गरज निर्माण झाली आहे, हे लक्षात येईल. म्हणूनच या मुद्दय़ावर राजकारण न करता, रस्ते खड्डेमुक्त राहण्यासाठी नव्या प्रभावी तंत्रज्ञानाचा शोध घेण्याची गरज आहे.
जत विभागातील संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झाली होती. वर्तमानपत्राच्या ससेमि-यामुळे प्रशासनाने रस्ते पूर्ववत केले. भरलेले खड्डे पुन्हा उखडले. रस्ते ठेकेदारांना फक्त दंड आकारून समस्या सुटणार नाहीत. त्यासाठी रस्त्यांची बांधकाम पद्धती व रचना यात सुधारणा करणे आवश्यक आहे. तेव्हाच खड्डेविरहित रस्ते नागरिकांना उपलब्ध होतील.
जतकरांना आयोडेक्सच्या बाटल्या द्या ;पावसाळा आला आणि आता जायची वेळही आली मात्र काही खड्डेमुक्त झाली नाही. काही ठिकाणी खड्डे बुजवले आहेत पण ते ही निष्काळजीपणाने.. खड्डे बुजवल्यामुळे अजूनच त्रास वाढला आहे. फक्त खडी टाकून खड्डे बुजवल्यामुळे रस्त्यावर उंचवटा तयार झाला आहे. यामुळे गाडी चालवताना खूप त्रास होतो. कारऐवजी जणू बैलगाडी चालवतोय असे वाटते. रस्त्यावर आलेल्या उंचवटय़ामुळे वाहने ना-दुरुस्त तर होतातच मात्र शरीरालाही त्रास होतो. खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडीची समस्या आहे. त्यातच खडखडाटामुळे शरीराला होणारा त्रास काही कमी नाही.जतच्या सत्ताधा-यांना खड्डे कमी करता येत नसेल तर त्यांनी किमान जतकरांच्या प्रत्येक घरांत आयोडेक्सच्या बाटल्या द्याव्यात म्हणजे घरी परतल्यानंतर हे मलम लावल्यावर आराम वाटेल,असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
खड्डय़ांसाठी जनआंदोलन आवश्यक
स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवकांनी गाडीतून फिरण्यापेक्षा रस्त्यावरून फिरावे आणि रस्ता बनविताना तो पाच वर्षे खराब होणार नाही, याची लेखी हमी विकासकाकडून घ्यावी. विकासकाने रस्ता बनविताना समांतर तयार करावा. कारण पावसाळ्यात खड्डय़ात पाणी पाणी साचते. त्यामुळे नागरिक व शाळकरी मुलांना रस्त्यांतून चालता येत नाही.
नगरपालिकाही चांगला रस्ताच बनवण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. एखाद्या कंत्राटदाराने रस्ता चांगला बनवल्यास नगरपालिका अधिकारी, नगरसेवक त्याची देखरेख करत नाहीत. विकासक गटार वाहिन्या, पाण्याच्या आणि वीजेच्या जोडण्यांसाठी रस्ता खोदून ठेवतात आणि दगड व माती चोरून नेतात. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडतात.
जत सांगली रोडवरील जीवघेणे खड्डे