बालगांव,वार्ताहर : उसाच्या फडात राज्यातील ऊस गळीत हंगाम सुरू झाल्याने जत तालुक्यातील ऊसतोडणी मजुरांचे बिऱ्हाडसह स्थलांतर सुरू झाले आहे. दरवर्षी आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी हंगामी वस्तीगृह तसेच आजी-आजोबांकडे मुलांना सोडून जाणारे हे मजूर यंदा मात्र कोरोनाच्या दहशतीमुळे शाळा बंद असल्याने,आपल्या मुलांना सोबत घेऊन ऊस तोडणी ला गेले आहेत.त्यामुळे अनेक गावे,वाड्या, तांडे ओस पडली आहेत.त्याबरोबर दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यावर शाळेच्या पटसंख्या वर परिणाम होणार आहे.
या मुलांना खोपटाची राखण करणे, जनावरांना सांभाळणे,ऊस तोडणी कामात मदत करणे,वाडे गोळा करणे, लहान भावंडांना सांभाळणे या कामाकरिता शाळकरी मुले स्थलांतरित झाल्याचे चित्र पूर्व भागात पहायला मिळत आहे. मुकादम यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे मजुरांना सोन्याचे दिवस आले आहेत.हे मजूर एक व त्यापेक्षा अधिक मुकादमाकडून लाखांपेक्षा अधिक उचलून आपले जीवन आयुष्य जगण्याचे सुरू केले आहे. त्यामुळे अनेक मुकादमाला मजूर संभाळणे जिकिरीचे बनले आहे त्यामध्ये 10 ते 18 वर्षाखालील मुलांना सुद्धा उचल देऊन ऊस तोडणी सुरू झाल्याचे चित्र आहे.पूर्वभागातील हळ्ळी, बालगाव, उमदी,करजगी,बोर्गी बेळोडगी, गिरगाव,आकळवाडी या भागातील अनेक ऊसतोड मजूर स्थलांतर झाले आहेत.
मुकादमाकडून लाख दीड लाखापर्यंत उचल उचलून त्यांच्या प्रपंचाचा गाडा चालवत आहेत. मात्र आपल्यासोबत लहान मुलांना देखील घेऊन गेल्याने लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र पाण्याचे मोठे स्रोत आहेत. त्यामुळे ऊस तोडणीला गेलेल्या लहान मुलांना सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे.
तालुक्यात उद्योगधंद्याची गरज:सतीश अजमाने
जत तालुक्यात कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची निर्मिती करण्याची मागणी यापूर्वीच सुशिक्षित बेरोजगारांनी कित्येक वेळा करूनही येथील लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने सुशिक्षित बेरोजगारांची देखील स्थलांतर वाढले आहे.