जतेत थंडीची चाहूल, तापमान उतरले : ऋतुचक्र रुळावर
जत,प्रतिनिधी : गतवर्षी डिसेंबर, जानेवारीपर्यंत वाट पाहायला लावलेल्या थंडीने यंदा मात्र ऑक्टोबर संपतानाच चाहूल दिली आहे. रात्रीचे तापमान 15-20 अंश सेल्सिअसवर खाली गेल्याने पहाटे काहीशी हुडहुडी भरू लागली आहे. नुकताच पावसाळा संपल्याने छत्र्या, रेनकोट कपाटात जाण्याआधीच अचानक आलेल्या थंडीने उबदार कपड्यांच्या घड्या कपाटाबाहेर डोकावू लागल्या आहेत.
साधारणपणे दिवाळीपासून खऱ्या अर्थाने थंडीचे आगमन होते; पण गेल्या वर्षी म्हणावी तशी थंडी पडलीच नाही. ऐन दिवाळीत पाऊस पडत होता. पावसाळा लांबत गेल्याने थंडीची तीव्रता जाणवलीच नव्हती. त्यानंतर मार्चमध्ये लगेच कडक उन्हास सुरुवात झाल्याने थंडीचा आनंद घेताच आला नाही. यावर्षी मात्र ऋतुचक्र रुळावर आले आहे. पावसाळा वेळेत संपला आणि पाठोपाठ लगेच थंडीही आली आहे.
