दिशाहीन समाजाल वठणीवर आणणार कोण?
सध्या अनेकांना या देशाचे कसे होणार असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे त्यांचा त्रागा होत आहे. सांगायचे कुणाला, असा सवाल त्यांच्यापुढे असून सगळेच माळेचे मणी आहेत, असा प्रत्ययही त्यांना येत आहे. घराबाहेर पडल्यापासून त्यांना अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे,ज्यामुळे त्यांना देशाची चिंता वाटते आहे. रस्त्यावरून चालण्यापासून ते कार्यालयातल्या कामापर्यंत सगळीकडे त्यांना वाढत चाललेला बेजबाबदारपणा, हरवत चाललेली नीतीमत्ता,मूल्यशिक्षणाचा अभाव आणि सामाजिक जाणिवांचा विसर यामुळे आदर्शहीन बनलेल्या समाजाला आदर्शाचा पाठ कसा शिकवायचा असा प्रश्न त्यांना पडला आहे. देशात सुजाण नागरिकांची संख्या दुर्मिळ होत चालली असल्याचा त्यांचा दावा असून या धक्कादायक परिस्थितीमुळे ती मंडळी अगदी कासाविस झाली आहेत.
अशा दिशाहीन आणि आदर्शहीन समाजाला कोण चांगुलपणाची वाट दाखवणार, असा प्रश्नही त्यांना पडला आहे.रस्त्यावरून चालताना किंवा गाडीवरून जाताना अचानक मोठमोठा हॉर्न करत तरुण पोरं मागून झपकन पुढे जातात,तेव्हा यांच्या काळजात धस्स होतं. हॉर्नच्या आवाजाने कान बधीर होतात.चक्कर येऊन खाली कोसळतोय की काय, असेच वाटून जाते. खरे तर आजच्या पिढीने दुसर्यांची काळजी करायला हवी. यासाठी स्वत: ला एक शिस्त लावायला हवी,असं त्यांना वाटतं. व्यक्तिगत व सामाजिक आरोग्य, वाहतुकीचे नियम, सावर्जनिक ठिकाणची स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन अशा किती तरी गोष्टींची काळजी घ्यायला हवी. असे करणाराच एक सजग आणि सुजाण नागरिक समजला जातो. समाज माझ्यासाठी काय करतो, यापेक्षा आपण समाजासाठी काय केले पाहिजे, या गोष्टींकडे लक्ष देणारा नागरिक घडायला हवा आहे. कायद्याने घालून दिलेल्या बंधनाचे पालन प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने करायला हवे, असे त्यांना वाटते.आदर्शाच्या कल्पना काळ, परिस्थिती, देशानुरुप बदलतात. प्रत्येकाने कायद्याचे पालन करताना सार्वजनिक जीवन जगताना जे स्वत:ला हक्क आहेत ते इतरांना देखील आहेत,याची जाणीव ठेवून इतरांच्या हक्कांवर अतिक्रमण होणार नाही,याची काळजी घेणारा नागरिक घडणार का, असा सवालही त्यांचा आहे.
आपल्या लोकांना देशसेवा,भक्ती म्हणजे काय असते,याचीही जाणीव करून द्यायला हवी आहे. केवळ सीमेवर जाऊन शत्रूशी युद्ध करणे, अतिरेक्यांशी लढणे यालाच देशभक्ती म्हणत नाहीत, हे कुणीतरी सांगायला हवे आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे, देशाप्रती आपल्या कर्तव्याची जाण ठेवणे, वडिलधार्यांचा आदर करणे आणि स्वत:शी आणि देशाशी प्रामाणिक राहणे, ही मूल्ये जोपासली गेली तरच खर्या अर्थाने राष्ट्रभक्ती ठरणार आहे. आपल्याला मिळालेल्या नैसर्गिक देणग्यांच्या वापर करायला शिकले पाहिजे. बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्याला मिळालेल्या नैसर्गिक देणग्या आहेत. त्यांचा वापर योग्यवेळी करणे अपेक्षित आहे. परंतु ही नैतिक मूल्ये सद्याच्या परिस्थितीत पाळली जात नाहीत.
आपल्या शिक्षणाचा, अनुभवाचा आणि कौशल्याचा चांगल्यासाठी वापर झाला पाहिजे. म्हणजे हा वापर थेट देशासाठीच होतो, हे ध्यानात घेतले पाहिजे.भ्रष्टाचार, कामात चालढकलपणा या गोष्टी स्वत:च्या र्हासाला कारणीभूत आहेत. असेच चित्र राहिले तर भावी पिढीसाठी हे फारच वाईट, चिंताजनक असणार आहे. समाज अधोगतीला चालला आहे. तो सुधारण्याची आवश्यकता आहे, यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. चुकणार्याला सामुहिकरित्या समजावून सांगितले पाहिजे. कारण आजच्या काळात कुणाला चांगले सांगितलेले रुचत नाही. सांगणार्याचीच अवस्था वाईट होते. का सांगायला गेलो, असे काहींना झाल्याचे सांगितले जाते.
आपले गाव, परिसर, राष्ट्र सुसंस्कृत, शीलसंपन्न वगैरे व्हावे, असा वाटणार्यांची संख्या वाढायला हवी. विवेकाने, संयमाने, दैर्याने प्रश्नांना सामोरे जाणारा नागरिक बनायला हवा आहे. तरच समजदार नागरिक तयार होतील. असे शिक्षण घराघरांतून द्यायला हवे आहे. मानवी मनावर बालपणापासून संस्कार व्हायला हवेत. याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी, असे म्हणूनच त्यांना वाटते. लहानपणी आपले पालकच आपले आदर्श असतात. ते जसे वागतील तसे मुलांवर संस्कार होतात. रस्ता ओलंडताना, सार्वजनिक स्थळी वागताना घरातील वरिष्ठ जसे वागतात, तशीच सवय मुलांना लागते.यामुले घरातूनच योग्य संस्कार ,वर्तन, सवयी लावण्यासाठी पालकांनी काळजी घ्यायला हवी, असे काहीजणांना वाटते.अर्थात हे काहीजणही फारच थोडे म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत.त्यामुळेच साहजिक बहुमताचे पारडे ज्याच्याकडे त्यांचेच समाज अनुकरण करणार ना?
मच्छिंद्र ऐनापुरे,जत