सांगली : सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या बिळूर गावाच्या ग्रामस्थांची भेट आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतली.
सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील बिळूरसह आठ गावांत म्हैसाळ सिंचन योजनेचे काम रखडले आहे. हे काम सुरू करण्यात यावे या मागणीसाठी या गावातील ग्रामस्थांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले होते. माजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जावून या आंदोलकांची भेट घेतली व प्रभारी जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांच्याशी या विषयावर चर्चा केली. यावेळी येत्या पाच ते सहा दिवसात या गावातील काम पूर्ववत करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
जत तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. पिण्याच्या पाण्यासाठी देखील ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. दिलेल्या आश्वासनप्रमाणे शासन लवकरात लवकर या गावांमध्ये म्हैसाळ योजनेचे काम पूर्ववत करतील व या भागातील ग्रामस्थांना दिलासा देतील अशी आशा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.