डंख छोटा पण धोका मोठा….

0
6

जत : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव डासापासुन होतो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही सर्व स्तरावर प्रयत्न केले गेले त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येतो. सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. जागतिक आरोग्य संघटनेचे या वर्षाचे घोषवाक्य Malaria : Invest, Innovate, Implement असे असून या आजाराचा उद्रेक होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. हिवताप आणि त्याचा प्रसारहिवताप हा आजार प्लाझमोडीअम या परोपजीव जंतुमुळे होतो. या आजाराचा प्रसार अँनाफिलस डासाच्या मादी मार्फत होतो.

 

जगात सर्वसाधारणपणे ३० ते ५० कोटी लोकांना या रोगाची लागण होते. महाराष्ट्रात हिवतापाच्या जंतुचे फॅल्सीफेरम व व्हॉयव्हॅक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळुन येतात. डासांची उत्पत्ती ही स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इ. मध्ये होते. हिवतापाचा प्रसार अँनाफिलस डासाची मादी हिवताप रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतु डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होऊन डासाच्या चाव्यानंतर लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरिरात सोडले जातात. पुढे निरोगी मनुष्याच्या शरिरात ते जंतु यकृतमध्ये जातात व तेथे त्यांची वाढ होऊन १० ते १२ दिवसांनी मनुष्याला थंडी वाजुन ताप येते.
हिवतापाची लक्षणे, औषधोपचारथंडी वाजुन ताप येणे, ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवस आड येऊ शकतो, ताप नंतर घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याच वेळा उलट्या होतात.

 

याबाबत प्रयोगशाळेत रक्तनमुना तपासणी करावी. हिवतापाचे खात्रीशीर निदान हे रुग्णाचा रक्त नमुना तपासुन करता येतो. अशा रक्त नमुन्यात हिवतापाचे जंतु आढळतात. प्रत्येक ताप रुग्णाने आपला रक्त नमुना नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासुन घ्यावे. हिवताप दुषित रक्त नमुना आढळून आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्वीन व प्रायमाक्वीन गोळयाचा औषधोपचार घ्यावा. ही औषधी उपाशीपोटी घेऊ नये. गर्भवती स्त्रियांनी प्रायमाक्वीन औषधी घेऊ नये व शून्य ते एक वर्षाच्या बालकांना प्रायमाक्वीन औषधी देऊ नये.हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका.घरातील पाण्याचे सर्व साठे आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक वार निश्चित करुन रिकामे करावेत.

 

आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडया करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणीने झाकून ठेवावेत.अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.संध्याकाळी सहा ते आठ दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात, खिडक्यांना जाळया बसवाव्यात, झोपताना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा.आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारुण घ्यावे.घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी आदीची वेळीच विल्हेवाट लावा. संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.प्रत्येकाने दक्षता घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार आजारापासून दूर ठेवील. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वानी हातभार लावावा,असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here