सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये शासन निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजनेतील एकूण 3 लाख 99 हजार 764 पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गौरी गणपती सणा निमित्त शासनाकडून 100 रुपये मध्ये 4 शिधाजिन्नस वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शिधापत्रिकाधारकांना अन्न धान्या व्यतिरिक्त प्रत्येकी एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेलाचा संच दिला जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील 3 लाख 99 हजार 764 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार असून पुरवठा विभागाकडून वाटपाचे नियोजन हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी दिली.
पात्र रेशनकार्ड धारकांना शिधाजिन्नस संच प्रति शिधापत्रिका ई-पास (ePos) प्रणालीव्दारे शंभर रुपये दराने वितरित करण्याचे शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली यांनी सांगली जिल्ह्यासाठी आवश्यक शिधाजिन्नस संचाची मागणी शासनास सादर केली होती. यानुसार जिल्ह्यासाठीचे शिधाजिन्नस संच शासनाने निश्चित केलेल्या प्रादेशिक व्यवस्थापक, केंद्रीय भांडार, मुंबई या कंत्राटदाराकडून तालुक्यांच्या गोदामापर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
उपलब्ध झालेले शिधाजिन्नस पात्र शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या रास्त भाव दुकानदारांमार्फत उपलब्ध होणार आहेत.तालुकानिहाय आवश्यक शिधाजिन्नस संच पुढीलप्रमाणे. सांगली – 52 हजार 494, मिरज – 45 हजार 990, कवठेमहांकाळ – 23 हजार 235, जत – 50 हजार 195, आटपाडी – 22 हजार 450, कडेगाव – 24 हजार 375, खानापूर-विटा – 26 हजार 630, तासगाव – 41 हजार 20, पलूस 27 हजार 295, वाळवा – 60 हजार 545, शिराळा – 25 हजार 535.
00000





