जत : “राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मला नव्हे, तर माझ्या मुलाला त्यांच्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती,” असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला. जत येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जयंत पाटील यांनी महादेव जानकर यांच्या कार्याचे कौतुक करताना त्यांच्या राजकीय भूमिकेचाही उल्लेख केला. “जानकर यांना सत्तेचा फारसा फरक पडत नाही. वंचित आणि सर्वसामान्य समाजातील मुलांनी शिकावे, प्रगती करावी, हीच त्यांची भूमिका आहे,” असे पाटील म्हणाले.
राहुल गांधींच्या कपड्यांचा उल्लेख
महादेव जानकर आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पोशाखातील साम्याचा उल्लेखही जयंत पाटील यांनी केला. “महादेव जानकर आणि राहुल गांधी यांच्या कपड्यांचा रंग एकच आहे. त्यामुळे त्यांचे आणि राहुल गांधींचे चांगलेच जुळले आहे, असे सध्या तरी वाटते,” अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.या विधानामुळे जानकर यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत चर्चांना उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जानकर कोणत्या राजकीय आघाडीसोबत जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
‘जानकरांसोबत काम करण्याची इच्छा’
महादेव जानकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे सांगत जयंत पाटील म्हणाले की, समाजातील वंचित घटकांच्या प्रगतीसाठी जानकर सातत्याने काम करत आहेत. त्यांच्यासोबत भविष्यात काम करण्याची आपली इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जत येथे अण्णा भाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने जयंत पाटील आणि महादेव जानकर एकाच मंचावर उपस्थित होते. त्यातच पाटील यांनी केलेल्या पक्षप्रवेशाच्या ऑफरच्या गौप्यस्फोटामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. जानकर आणि महाविकास आघाडीतील संभाव्य जवळीक तसेच आगामी राजकीय समीकरणांबाबत आता तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.




