सांगली : तासगाव येथील रुग्णालयातून नवजात बाळाचे अपहरण केल्याप्रकरणी आरोपी नर्स स्वाती छबुराव माने ऊर्फ लक्ष्मी मच्छिंद्र पवार (वय ३८, रा. रामानंदनगर, किर्लोस्करवाडी, ता. पलूस) हिला सांगली जिल्हा न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी सोमवारी हा निकाल दिला.
तासगाव येथील सिद्धेश्वर चौकातील सरस्वती आनंद हॉस्पिटलमध्ये २२ जुलै २०२२ रोजी एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. दुसऱ्या दिवशी तिची प्रसूती होऊन मुलगा झाला. त्याच दिवशी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत असलेली स्वाती माने बाळाजवळ आली. बाळाला डॉक्टरांना दाखवून आणते, असे सांगून तिने बाळाला सोबत नेले.
त्यानंतर तिने नवजात बाळाला एका पिशवीत ठेवून रुग्णालयातून बाहेर काढले आणि रिक्षातून निघून गेली. बाळ बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. फुटेजमध्ये आरोपी रिक्षातून जात असल्याचे स्पष्ट झाले. रिक्षाचालकाच्या मदतीने पोलिसांनी तिचा शोध घेतला असता ती तिच्या घरी बाळासह आढळून आली.
तपासात आरोपीने बाळाचे अपहरण करण्याच्या उद्देशाने तासगावमधील संबंधित रुग्णालयात नर्सची नोकरी मिळवल्याची माहिती समोर आली. उपनिरीक्षक संदीप गुरव यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील माधव कुलकर्णी आणि साटविलकर यांनी १७ साक्षीदार तपासले. सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने स्वाती माने हिला दोषी ठरवून सात वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी सहायक निरीक्षक मुदस्सर शेख, महिला पोलिस सुनिता आवळे, रवींद्र माळकर आणि उपनिरीक्षक उदय गाडे यांनी सहकार्य केले.




