पीकपंचनामे वेळेत पूर्ण करा; अफवांवर विश्वास ठेवू नका

0
1

सांगली : खरीप हंगाम २०२६ मध्ये आटपाडी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाच्या निर्देशानुसार पीकपंचनामे १० दिवसांत पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू आहे. पंचनामे वेळेत पूर्ण होण्यासाठी शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले.

जिल्हाधिकारी घोष यांनी आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी व धावडवाडी येथे भेट देऊन पिकांची व दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांचे नुकसान, पिण्याचे पाणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत अडचणी जाणून घेतल्या.

पीकपंचनाम्यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुकची छायांकित प्रत आणि फार्मर आयडी एवढीच कागदपत्रे द्यावीत. याशिवाय कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे मागितली जात असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. पंचनाम्याची पुढील कार्यवाही शासकीय यंत्रणांकडूनच केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आटपाडी तालुक्यात पाटबंधारे विभागामार्फत पाणी सोडण्यात आल्याने सध्या पाच टँकर सुरू आहेत. मागणीनुसार टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नागरिक तसेच जनावरांना पिण्याचे पाणी आणि चारा उपलब्ध राहील, यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here