डफळापूरमध्ये दीड महिन्यानंतर खुनाचा उलगडा; पाच जणांविरुद्ध गुन्हा

0
14

जत : जत तालुक्यातील डफळापूर येथील परूळेकर मळ्यात २२ ऑगस्टच्या रात्री ५२ वर्षीय आप्पासो लक्ष्मण चव्हाण यांचा खून झाल्याचा प्रकार तब्बल दीड महिन्यानंतर उघडकीस आला आहे. पत्नीचे गंगाधर रामू तेली याच्यासोबत कथित प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा खून करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयताचे भाचे मनोजकुमार तानाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गंगाधर रामू तेली, मयताची पत्नी सुनिता आप्पासो चव्हाण, विक्रांत सर्जेराव चव्हाण, प्रतिक लक्ष्मण मोकाशी आणि मयताची मुलगी सोनु ऊर्फ ऐश्वर्या आप्पासो चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत करण्यात आलेल्या आरोपानुसार, सुनिता चव्हाण आणि गंगाधर तेली यांच्यात गेल्या १८ वर्षांपासून कथित प्रेमसंबंध होते. याची माहिती आप्पासो यांना झाल्यानंतर त्यांनी पत्नीवर संशय घेत वारंवार वाद घातल्याचे सांगण्यात आले आहे. या कारणातून गंगाधर आणि सुनिता यांनी आप्पासो यांचा काटा काढण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

या कटात विक्रांत चव्हाण आणि प्रतिक मोकाशी यांना सहभागी करून घेण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विक्रांतला एक लाख रुपये देण्याचे ठरल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

२२ ऑगस्टच्या रात्री आप्पासो घरात झोपले असताना सुनिताने जेवणातून गुंगीच्या गोळ्या दिल्याचा आरोप आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास तिने घराचा दरवाजा उघडून गंगाधर, विक्रांत आणि प्रतिक यांना घरात प्रवेश दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी ऐश्वर्याने घराबाहेरील कुत्र्याला पकडून ठेवल्याचा आरोप आहे.

घरात प्रवेश केल्यानंतर विक्रांतने आप्पासो यांचे हात, तर प्रतिकने पाय पकडले. त्यानंतर गंगाधरने उशीने तोंड दाबून आणि हाताने गळा आवळून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे. खून केल्यानंतर आप्पासो यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

रुग्णालयात डॉक्टरांनी आप्पासो यांना मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच कपडे, अंथरूण आणि उशी जाळून पुरावे नष्ट केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुनिताने फिर्यादीसमोर कथितरीत्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर चौकशी करून खात्री झाल्यावर मनोजकुमार जाधव यांनी ४ ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विजय घेरडे करीत आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here