कवठेमहांकाळ : देशिंग (ता. कवठेमहांकाळ) गावच्या हद्दीतील तिरमलवाडी येथे आईनेच सव्वा वर्षांच्या मुलीवर कात्रीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या श्रीशा महादेव क्षीरसागर या चिमुकलीचा मृत्यू झाला. घटनेने तिरमलवाडी तसेच देशिंग परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मुलीची आई अनिता महादेव क्षीरसागर (वय २६) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक पुरावे संकलित केले असून, घटनेच्या परिस्थितीची चौकशी सुरू केली आहे.
घटनेवेळी घरातील इतर सदस्य बाहेरगावी असल्याची प्राथमिक माहिती आहे. श्रीशाचे वडील महादेव क्षीरसागर हे शिरढोण येथे हेअर कटिंगचा व्यवसाय करतात. त्यामुळे घटना घडली त्यावेळी घरात नेमकी काय परिस्थिती होती, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, अनिता क्षीरसागर यांची मानसिक स्थिती बिघडलेली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर यापूर्वी मानसिक आरोग्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. मात्र, या उपचारांची अधिकृत कागदपत्रे व वैद्यकीय अहवाल पोलिसांकडून तपासले जात आहेत.
घटनेनंतर मृत चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तसेच अनिता यांच्या मानसिक स्थितीची तज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी केली जाणार असून, वैद्यकीय अहवाल आणि तपासातील निष्कर्षानंतर पुढील कायदेशीर कारवाई निश्चित केली जाणार आहे.
हल्ल्यामागील नेमके कारण काय, घटनेच्या वेळी आईची मानसिक अवस्था कशी होती आणि या घटनेशी तिच्या पूर्वीच्या उपचारांचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे क्षीरसागर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




