सातारा : टीव्हीच्या आवाजावरून दोन बहिणींमध्ये झालेल्या वादानंतर संतापलेल्या वडिलांनी मुलीच्या डोक्यात बॅटने प्रहार केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात घडली. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी संबंधित वडिलांनी AI कडे मदत मागितल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे वृत्त आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री दोन बहिणींमध्ये भांडण झाले. यावेळी वडील पुरुषोत्तम कदम यांनी संतापाच्या भरात मोठ्या मुलीच्या डोक्यात बॅटने प्रहार केला. त्यात तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर घाबरलेल्या कदम यांनी काही काळ विचार केल्यानंतर पुरावे कसे नष्ट करावेत, याबाबत AI ला प्रश्न विचारला.
मात्र AI कडून गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासंदर्भात मदत देण्यास नकार देण्यात आला आणि पोलिसांना माहिती देण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यानंतर कदम यांनी रक्ताने माखलेला टी-शर्ट वॉशिंग मशीनमध्ये धुतला, घरातील रक्ताचे डाग साफ करण्याचा प्रयत्न केला आणि रक्ताने माखलेली बॅट घराच्या टेरेसवर फेकून दिल्याचा आरोप आहे. तसेच मुलीने स्वतःचे डोके भिंतीवर आपटल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
मात्र पोलिसांना या कथनाबाबत संशय आल्याने घराची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान भिंतीवर रक्ताचे डाग आणि टेरेसवर रक्ताने माखलेली बॅट आढळल्याचे समोर आले. त्यानंतर चौकशी करून मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पुरुषोत्तम कदम यांना अटक करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



