मिरज : महाराष्ट्रातील दुष्काळाची तीव्रता वाढत असताना २०१६ मध्ये मिरजेतून लातूरला धावलेल्या ‘जलदूत’ पाणी रेल्वेची पुन्हा आठवण झाली आहे. दुष्काळग्रस्त भागांना रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष गाड्या चालविण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने दर्शविली आहे. मात्र, मिरज रेल्वे स्थानकावर दहा वर्षांपूर्वी उभारलेली पाणी भरण्याची यंत्रणा आता मोडीत काढण्यात आल्याने नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
२०१६ मध्ये लातूरमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर मिरजेतून ‘जलदूत’ची सुरुवात करण्यात आली होती. ११ एप्रिल २०१६ रोजी पहिली जलदूत रेल्वे लातूरकडे रवाना झाली. या रेल्वेने तब्बल १२८ फेऱ्या करून २४ कोटी लिटरपेक्षा अधिक पाणी लातूरला पोहोचविले होते.
अडीच कोटींची यंत्रणा हटविली
लातूरमधील पाणीटंचाईचे संकट कमी झाल्यानंतर जलदूतची आवश्यकता राहिली नाही. त्यानंतर मिरज स्थानकावर सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून उभारलेली पाणी भरण्याची व्यवस्था मोडीत काढण्यात आली. हैदरखान विहिरीतील पंप हटविण्यात आले असून रेल्वे टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी उभारलेले स्टॅन्ड पाईपही काढण्यात आले आहेत.
मिरज स्थानकाला लागून असलेल्या हैदरखान विहिरीत कृष्णा नदीतून आणलेल्या पाण्याचा साठा केला जात होता. पाणी उपसण्यासाठी प्रत्येकी ५० अश्वशक्ती क्षमतेच्या चार मोटारी बसविण्यात आल्या होत्या. आता दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने ही यंत्रणा पुन्हा उभारण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
जलदूतची गरज निर्माण झाली, पण पूर्वीची यंत्रणा नसल्याने पाणी रेल्वे सुरू करण्यापूर्वी पायाभूत सुविधा पुन्हा उभाराव्या लागणार आहेत.




