आठवणींच्या ड्रॉवरमधून… सत्यनारायण ; महादेव बी. बुरुटे

0श्रावण…! 

सणासमारंभाचा राजा…!! 


अनेक कारणांमुळे, उदाहरणार्थ श्रावणातला भुरळ घालत पिंगा घालायला लावणारा लाजरा साजरा सप्तरंगी निसर्ग, सारं काही मंगलमय करणारे सणासमारंभ. आणि सर्वांना मंगलमयतेची अनुभूती देणारी श्री सत्यनारायणाची पूजा.

आमचे शेतकरी कुटुंब तसे श्रद्धाळू. देवादिकांना माणणारे. पण अंधश्रध्दाळू मात्र नक्कीच नसणारे. पंढरीच्या पांडुरंगावर मनस्वी श्रद्धा. वर्षातील आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारी शक्यतो न चुकवणारे. यात आठ दहा दिवस न घालवता वारीच्या आदल्या दिवशी  नेहमीप्रमाणे दिवसभर शेतात काम करुन रात्री वाळेखिंडी अर्थात जतरोड रेल्वे स्टेशन वरून जावून दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी चंद्रभागेतिरी अंघोळ करून माळ बुक्का, वाहून नामदेव पायरी पासून विठ्ठलाचे मुख दर्शन झाले की विठ्ठलाचा लाह्या, चुरमुरे, बत्तासे असलेला प्लास्टिकच्या बंद पिशवीतील प्रसाद, इभतीचा चौरस आकाराचा माला, घरातील आम्हा बारक्यांना एखादी नक्षीची टोपी, चड्डी, एखादे खेळणे, बहीणीसाठी भिंगाचे चुडे, घरच्या स्त्रीयांना लाखेचे चुडे, कुंकू वगैरे आणि अगदी आठवणीने बैलांना गोंडे, दावी, कधी झुली घेऊन लगेच परत येऊन आपल्या शेतकामात गढून जात.पितळेच्या घुंगरांचे चाळही आणलेले होते.वडिलांनी सुद्धा ही परंपरा जपलेली होती.आजही हा नेम दिवसमानानुसार कमी अधिक प्रमाणात का होईना पण आमच्या कडे सुरु आहे. 

सर्वांचीच विठू चरणी श्रद्धा आहे. आजही पूर्वी प्रमाणेच दर पंधरा दिवसांची एकादशी मात्र चुकत नाही. कुटुंबातील एक जेष्ठ व्यक्ती एकादशी करते. असो. आमच्याकडे आजोबा व वडिलांच्या हयातीत सत्यनारायण पूजा नेहमी व्हायची. आजही होते पण पूर्वीसारखे सातत्य नाही. त्या दिवशीचा म्हणजे शक्यतो सोमवारचा उत्साह आणि लगबग काही वेगळीच असायची. वातावरणात पावित्र्य ओसंडून वहात असल्याचा अनुभव यायचा. सकाळपासूनच घरात स्वच्छता सुरु व्हायची. घर-दार सारवून, कपडे धुवून, भांडी घासून पुसून घ्यायची घरातल्या महिलांची घाई चाललेली असायची. 

पण कुठेही आदळ आपट, कामाची नाराजी नसायची. लहान थोरांसकट साऱ्यांनी डोक्यावरून अंघोळ करायची. रोजचेच धुतलेले कपडे; पण आज एकदम फ्रेश आणि हलके हलके, पवित्र वाटायचे. सारे कसे हसत खेळत उत्साहाने सुरु असायचे. पूजेच्या प्रसादाचा मुख्य मेनू म्हणजे भरडलेल्या गव्हाची खीर. त्यासाठी घरातला मोठा तांब्याचा हंडा घासून पुसून लख्ख करुन उन्हात वाळायला ठेवला जायचा. सोन्यासारखा चमकायचा. त्यावर दोन तीन पिढ्यांपूर्वीच्या पुर्वजांचे नांव कोरलेले आहे. खीर वैयरताना व शिजवताना हलवण्यासाठी मोठी लाकडाची पळीही स्वच्छ धुवून तिथेच ठेवलेली असायची. ‘डाव’ म्हणतात तिला. चाटूही म्हणतात. 


दहा वाजण्याच्या सुमारास आमचा काका ( मावशीचा नवरा ) शेगाव पासून दोन अडीच किमी अंतरावर असलेल्या आणि वृक्षराजीनी निसर्गरम्य वातावरणातील बनशंकरी देवीच्या वास्तव्याने पुनित झालेल्या बनाळीहून केळीची खुटं घेऊन यायचा. तिथे केळीच्या बागा खूप असायच्या. इतर फळांचीही लागवड केली जायची. सोमवारी बाजारात बनाळीहून विक्रीसाठी शेतकरी फळे व इतर वस्तूही घेऊन येत. असो. तर काका सोबत पिशवीत पाऊस पांघरलेली ताजी टवटवीत नाजूक फुलं, चार दोन डाळींबाची, सिताफळाची कच्ची फळं, फुलकळ्या, केळी, बेलाची पानं, बेलफळं एखादं वगैरे साहित्य असायचं. मस्त सुगंध यायचा. ती केळीची मोठी हिरवीगर्द पोपटी पानं बघून, त्यांच्या सुगंधानं मन भरुन जायचं. उपमाच देता येत नाही त्याला. 


“यी यी. अगं ए म्हातारे, भिवा आला बग खुटं घिवुन. आरं ए पोरानु, खुटं ठिवा रं आत न्हिऊन.” अंगणात, गोठ्यात झाडलोट करता करता आजोबा फर्मान सोडायचे. आम्ही बारकी पोरं ती घ्यायला पुढे व्हायचो. पण भिवाकाका “आरं थांबा. झेपणार न्हाय. वजं हाय. मीच ठिवतू सरका. ही पिशवी धरा.” असं म्हणत हातातली पिशवी देत (त्या पिशवीत रानफुलं, डाळींबाची फुलं, फूलकळ्या, कच्ची सिताफळे, डाळींब, केळी, पेरू, त्यात काही पिकलेलीही फळे, बेलपाने, बेलफळे वगैरे असत.) दोन्ही हातांनी खांद्यावरली खुटं अलगद नेऊन माळीच्या आत कोपऱ्यात ठेऊन बाहेर येऊन दारातल्या लाकडी बाजल्यावर (मांड म्हणायचो आम्ही त्याला) बसत. तोंडावरचे हसू आणि समाधान तसूभरही कमी होत नसायचे. शक्यतो फिकट गुलाबी किंवा पांढरा पटका, जाड धोतर, अंगात मांजरपाट कापडी बंडी, कधीतरी तीन बटणी पांढरट किंवा आकाशी अंगरखा हा त्याचा नेहमीचा पेहराव! तेवढ्यात घरातून पाण्याचा तांब्या समोर आलेला असायचा. घटाघटा पाणी पिऊस्तवर आजोबा हात पाय धुवून शेजारी येऊन बसत, “बेस काम केलंच बग भिवा” म्हणायचे. “व्हय गा दादा. सकाळीच माळ्याच्या मळ्यात जाऊन घिवून आलू. जनावरांना वैरण पाणी बघून निगून आलू..”…….. 


वडिलांनी सकाळीच गावात जाऊन लक्ष्मण खडतरेंच्या घरातून सत्यनारायण कथेची पोथी आणून ठेवलेली असायची. दुपारी एक दिडच्या दरम्यान तयारी सुरु व्हायची. बाहेर दगडांची चूल करून त्यावर हंडा ठेवून पाणी ओतून जाळ लावला जायचा. या साऱ्यात तीन वाजून गेलेले असायचे. हंडयातील पाण्यास उकळी फुटलेली असायची. मग आई किंवा आजी घरात पाण्याने ओलावून ठेवलेली खीर त्या उकळत्या पाण्याचा व भरडलेल्या खिरीचा अंदाज घेऊन वैरायची. गाठी होऊ नयेत म्हणून लाकडी डावेने ढवळत रहायचे. खीर शिजेल तशी घट्ट होत जायची. मग त्यात ओल्या खोबऱ्याचा खिस, वेलदोडे वगैरे आणि गूळ घालून कमी जाळावर शिजत ठेवली जाई. पूर्ण शिजल्यावर नुसत्याच आरावर ठेवली जाई. मधूर सुवासिक खीर जराशी पातळ असतानाच हंड्याच्या गळ्याला कासरा बांधून दोघे तिघे तो कासरा धरून हंडा उतरुन ठेवत. हे होईस्तोवर कडूसं होत आलेलं असायचं. दरम्यान इकडे हा खीर करण्याचा सोहळा सुरू असतानाच घरात नैवेद्यासाठी पोळ्या, प्रसादासाठी शिरा तयार झालेला असायचा. तुम्ही इतर वेळी कितीही प्रयत्न करुन शिरा केला तरी या प्रसादाच्या शिऱ्याची सर त्याला येत नाही. या प्रसादाची रुची व पावित्र्य एक वेगळेच असते हे त्याचे न उलगडणारे वैशिष्ट्य आहे. या दरम्यानच वडील किंवा घरातील कुणीतरी मोठे घरात असलेली सागवानी लाकडाची चौक पेटी घेऊन ती स्वच्छ करून घरात सारवलेल्या जमीनीवर ठेवून तीच्यावर पूजा मांडली जाई. वर पांढरे मलमली सुती कापड किंवा ब्लाउज पीस पसरुन चारी बाजूंनी केळीची पाच खुटे उभी करून बांधली जात. वरील कपड्यावर विशिष्ट पद्धतीने तांदूळ पसरुन मधोमध तांब्याचा तांब्या पाणी भरुन त्यावर वरील बाजूस विड्याची पाने व त्यावर नारळ ठेवून ठेवला जाई. त्याच्या गळ्यात सोन्याचा दागिना घातला जाई. चारी बाजूंनी व मधे खारीक, खोबरे, हळकुंड, केळी तसेच उपलब्ध फळापैकी एकेक फळ, रांगणारा पितळेचा छोटा बाळकृष्ण ठेवून बुक्का लावला जाई. समोर एक पोते अंथरुण त्यावर पेटीला (चौरंगाला) टेकून देवाच्या मुर्ती लावल्या जात. समोर पंचारतीचे ताट, त्यात आगरबत्त्या, बुक्का, इभतीचा माला वगैरे वस्तू, दुसर्‍या एका ताटात फुले, फळे, पाने वगैरे व आणखी एका ताटात नैवेद्य ठेवलेला असे. आरत्यांमध्ये गोडे तेल, वाती घेऊन आरत्या, आगरबत्त्या लावल्या जात. सुगंधी परिमळाच्या दरवळाने पवित्र वातावरणात आणखीनच भर पडे. पोथी वाचण्याचा कार्यक्रम सुरू होइ. आम्ही घरचेच कोणीतरी किंवा पोथीमालक खडतरे, कधी जमलेल्यांपैकी एखादा पोथी वाचत असे. आई व आण्णा नवीन किंवा ठेवणीतले कपडे घालून पुजेस बसत. पुजेला सांगितलेल्यापैकी जमलेले लोक पोथी ऐकण्यास येऊन भक्तिभावाने बसत. प्रत्येकाला कपाळावर बुक्का, इभत लावली जाइ. अध्याय वाचणे सुरू होइ. 


Rate Card

प्रत्येक अध्याय संपला की ‘बोलाऽऽ.. पुंडलिका, वरदे हरी विठ्ठऽऽल.. श्री ज्ञानदेव, तुकाऽऽराम…. पंढरीनाथ महाराऽऽज की जय| सत्यनारायण महाराऽऽज की जय… ||’ असा घोष करीत फुले वाहीली जात. कापूर पेटवला जाइ. असेच पाच अध्याय संपले की मग सर्वजण उभे राहत. सर्वांच्या हातात फुले दिली जात. व आरती केली जाइ. 
वडील- 

‘घालीन लोटांगण, वंदीन चरण 

डोळ्यांनी पाहीन, रुप तुझे..’ 

ही आरती येईल तशी म्हणत. सर्वजण फुले वाहत. पंचामृत व प्रसाद आणला जाइ. पोथी वाचनारा किंवा आमच्यापैकी कुणीतरी प्रसाद द्यायला बसत. प्रत्येकजण येऊन सत्यनारायणाच्या पाया पडून आरतीच्या ताटात पाच, दहा, वीस पैसे, चार आणे दक्षिणा ओवाळून टाके. त्यांच्या उजव्या हातात आधी थोडा शिरा व त्यावर लहान चमच्याने दूध, दही, केळी वगैरे घालून तयार केलेले पंचामृत दिले की ते भक्तिभावे खाऊन हात डोक्यावर पुसत. क्वचितच कुणीतरी आठ आणे ओवाळणी टाके. सर्व वजनदार नाण्यांनी ताट वजनदार होइ. वीस पैशांचे सोनेरी नाणे उठून दिसे. जमलेल्या दक्षिणेवर पोथी वाचणाराचा हक्क असे…. (काही वेळा मीही वाचायचो. मला ती वजनदार नाण्यांची दक्षिणा मिळायची. ती मी दिवाळीत टिकल्या, एखादी लवंगी फटाक्यांची माळ घ्यायला एका कापडी बटव्यात घालून जपून ठेवायचो.) मग पंगत होइ. पंगतीत जेवणापूर्वी – माझे आजोबा पुढील श्लोक सुरात म्हणत 


अरे रावणा राज्य गंभीर केले..

सीते सारखे रत्न चोरून नेले…

सीते सारखे रत्न तुला पचेना…

चौदा चौखड्यांचे राज्य तुला घडेना….ll

बोला, पुंडलिक वर दे, हरी विठ्ठल…..

श्री ज्ञानदेव तुकाराम……

पंढरीनाथ महाराज की जय…..ll 

(वरील श्लोक कवी ज्ञानेश डोंगरे यांच्या सौजन्याने) 

तसेच 

‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे 

सहज हवन होते नाम घेता फुकाचे 

जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म 

उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म ||’ 


यासारखे श्लोकही अधूनमधून म्हणत पंगत सुरू होइ. बऱ्याच लोकांचा सोमवार चा उपवास असे. सर्वजण उपवास सोडत. आग्रह करत सर्व पदार्थ पानात वाढले जात. येतील तसे लोक अगोदर सत्यनारायणाला नमस्कार करुन कपाळावर इभतीचे पट्टे, बुक्का लावून प्रसाद घेऊन भक्षण करीत. नंतर गोड, मधूर खिरीचा मनसोक्त आस्वाद घेऊन घरी परतत. 
त्या रात्री मांडलेली पूजा तशीच ठेवली जाइ. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा केली जाइ. शक्यतो तांदळ, कुंदर, शेपू वगैरेपैकी एखाददुसरी रानभाजी, गरम भाकरीचा नैवेद्य दाखवून पुन्हा आरती करुन, प्रसाद वाटून पूजा सोडून खुटं, फुलं, कच्ची फळे एकत्र करुन ते सर्व निर्माल्य विहिरीत विसर्जित केले जाइ. पुजेतले खारीक, खोबरे, फळे वगैरे खाल्ले जाइ. एक रुपया दक्षिणा घालून पोथी परत नेऊन दिली जाइ. सर्वांची मने, सारं घरदार पवित्र, निर्मळ आनंदाने भरून गेल्याचा अनुभव येइ. अजूनही अधूनमधून आम्ही सत्यनारायणाची पूजा करतो. भिवा काकाचा मुलगा अर्थात आमचा मावसभाऊ तानाजी केळीचं खुटं, पाने, फुले वगैरे आत्मियतेने घेऊन येतो. पण त्यावेळेसारखे सारेच जमत नाही. खिरीऐवजी आता शिरा, भात, भाजी करण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. गावाच्या दक्षिणेकडे पूर्ण दगडी छोटे शिखर, पडवीचे बांधकाम असलेल्या पुरातन महादेव मंदिरात मात्र अजूनही दर वर्षी श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी खीर केली जाते. अगदी पूर्वीपासून तिथे त्या दिवशी छोटीशी जत्रा भरते. लोक भक्तिभावाने जाऊन खिरीचा प्रसाद घेतात. दर सोमवारी भाविक नित्य नेमाने तेथे जाऊन दर्शन घेऊन, तेथील झाडावरील बेल पाने, फळे प्रसाद म्हणून आणतात. महादेव बी. बुरुटे

शेगाव,ता.जत

मो.9765374805 
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.