शेतकऱ्यांसह गायीला घातला रासपने दुग्धाभिषेक | दूध दरवाढीसाठी रासप आक्रमक
जत,प्रतिनिधी : दुधाला दरवाढ द्या,या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जत तालुक्यातील दूध संकलन केंद्र बंद करण्यात आले.जत तालुक्यातील येळवी येथे रासपचे सांगलीचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील, जतचे शहराध्यक्ष भूषण काळगी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांसह गायीला दुग्धाभिषेक घालण्यात आला.राज्यात पाणी महाग आणि दूध स्वस्त: अशी विदारक परिस्थिती आहे. दुधाला दर वाढ द्यावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने माजी मंत्री आ.महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी राज्यभर दूध संकलन केंद्र बंद करत दुधाचे वाटप करण्यात आले.
जत तालुक्यातील येळवी येथे शासन दूध दरवाढ देत नसल्याचा निषेधार्थ पाटील,काळगी यांच्या प्रमुख उपस्थितीत गायीला व शेतकऱ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला.राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने थेट गायीला तसेच शेतकऱ्यांना दुग्धाभिषेक घालण्यात आला. तसेच दूध दरवाढीच्या घोषणा देण्यात आल्या. शासनाच्या विरोधात ही घोषणा देण्यात आल्या.यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आम्ही शासनाकडे वारंवार दूध दरवाढ द्यावी अशी मागणी करत आहोत पण शासनाने अद्याप मागणीची दखल घेतलेली नाही. दूध दरवाढ नसल्याने पशुपालक मेटाकुटीला आला आहे.यावेळी काळगी, भाऊसो खरात,आनंदा पाटील यांनीही शासनाचा निषेध केला.
यावेळी सुरेश गुरव, खैराव रासप शाखा अध्यक्ष हरिभाऊ दुधाळ, खैरावचे उपसरपंच रामचंद्र पाटील, दिलीप वगरे,तानाजी कदम, भारत गोयकर, अनिल व्हनमाने, निखिल सातपुते,आप्पासो खरात, इंजि.अनिरुद्ध संकपाळ आदी उपस्थित होते.

दुधदर वाढवावेत या मागणीसाठी शेतकऱ्यांसह गायीला घातला रासपने दुग्धाभिषेक घालत सरकारचा निषेध केला.