महागाई कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा द्या
कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांचे जगणे खडतर झाले आहे. मागील तीन महिन्यात लॉक डाऊनमुळे सर्वसामन्यांचे जगणे असह्य झाले होते. लॉक डाऊन शिथिल झाल्यावर सर्व काही ठीक होईल अशी अपेक्षा असताना पुन्हा लॉक डाऊनची वेळ आली. या लॉक डाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या काही दिवसांत इंधनाचे दर भडकले आहेत. पेट्रोल ८५ च्या तर डिझेल ८० च्या घरात पोहचले आहे. लॉक डाऊनच्या काळात इंधन विक्री प्रचंड घटली होती.
त्यामुळे तेल कंपन्यांनी झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी इंधनाची भरमसाठ दरवाढ केली आहे.पण त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. इंधनाची दरवाढ झाल्याने मालवाहतूक व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महागली आहे. इंधनाची दरवाढ झाली की महागाई वाढते या सूत्रानुसार लॉक डाऊनमध्ये महागाई झपाट्याने वाढली आहे. केवळ इंधनच नाही तर किराणा सामान, भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे दरही कमालीचे वाढले आहेत. लॉक डाऊनच्या नावाखाली अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने चढ्या दराने वस्तूंची विक्री सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक शहरात लॉक डाऊन केले आहे त्यामुळे महागाई वाढत जाईल अशी भीती सर्वसामान्यांना वाटत आहे.

वाढत्या महागाईचा फारसा परिणाम ऐपतदारांवर होत नसतो. उद्योजक, व्यापारी वाढत्या खर्चाची कसर कुठेतरी भरुन काढतात. सरकारी नोकरदारांना महागाई भत्ता मिळत असतो प्रश्न असतो तो हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य माणसांचा . वाढत्या महागाईने या सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाले आहे. गोरगरिबांचे संसार महागाईमुळे घायकुतीला आले आहेत. आधीच कोरोना त्यात महागाई त्यामुळे खायचे काय आणि जगायचे कसे असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे पडला आहे. या वर्गाला दिलासा देण्याचे काम सरकारने करावे. महागाई कमी करण्यासाठी सरकारने सर्वोतोपरी प्रयत्न करावे. किमान जीवनावश्यक वस्तूंचे दर तरी स्थिर ठेवावे. कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणणे सरकारसाठी कठीण असले तरी महागाई कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा देणे हे सरकारच्या हातात आहे. महागाई कमी करुन सरकारने सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५