
संख,प्रतिनिधी : टोणेवाडी (ता. जत) येथील रोजगार हमी योजनेतून तीन सिमेंट बंधारे मंजूर होते. मात्र यातील दोन बंधारे अस्तित्वातच नाहीत. एका बंधाऱ्याचे कामे अपूर्ण आहे. काम न करताच बंधाऱ्याचे 12 लाख रुपये दिले आहेत. या कामाची जलसंधारण उपविभागीय अधिकाऱ्यांकडून चौकशी झाली आहे. यानंतर रक्कम वसुलीचे आदेश दिले आहेत; पण ग्रामपंचायत व ठेकेदारांनी या पत्राला केराची टोपली दाखविली आहे.
टोणेवाडी येथे 2016 मध्ये कलाल ओल्यावर ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल कामातून घेरडे-नुलके, व्हळगुळे-बेरगळवस्ती व घोडके-नुलकेवस्ती या तीन ठिकाणी सिमेंट बंधारा कामे मंजूर होती. प्रत्येक बंधाऱ्याला 4 लाख रुपये मंजूर होते.मात्र बंधाऱ्यांचे 12 लाख रुपये काम न करताच अदा केले आहेत. कामे पूर्ण झाली नसताना पैसे दिल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील यांनी ई-पोर्टलवर केली होती. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.आदेशानंतर ग्रामसेवकांनी कामे 70 टक्के पूर्ण असल्याचे पत्र रोजगार हमी विभागाला दिले. पुन्हा चौकशी करून अहवाल मागविला होता. परत या कामाची खातेनिहाय चौकशी झाली आहे. चौकशीनंतर कामे पूर्ण नसल्याचा अहवाल दिला आहे.त्यानुसार 12 लाख भरण्याचे आदेश गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी ग्रामपंचायत,ठेकेदारांना काढले आहेत.
आराखड्यानुसार व्हळगुळे बेरगळवस्तीजवळील सिमेंट बंधारा बांधकामाला सुरुवात झाली. बंधायाचा पाया घालण्यात आला. जमिनीच्या वरपर्यंत बांधकाम आले आहे.20 ते 25 टक्के काम झाले आहे, तर घेरडे-नुलके,घोडके-नुलकेवस्ती याठिकाणी मंजूर असलेले दोन बंधारेच अस्तित्वात नाहीत.बंधारे चोरीला गेले आहेत, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.टोणेवाडी ता.जत येथील रोजगार हमी योजनेतून बांधलेल्या बंधाऱ्याचे काम अर्धवट सोडले आहे.